आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदारांवर प्रभावासाठी वापर हायटेक तंत्राचा, राजकीय पक्षांनी घेतला एलईडी डिस्प्लेचा आधार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुने नाशिक- पाणीनाही नळाला, मत द्या.....ला', "ताई-माई-अक्का विचार करा पक्का आणि ....वर मारा शिक्का', "जीव का जाईना, आता फक्त ....च' अशा विविध गल्लोगल्ली माईकवरून घोषणा देत फिरणारे कार्यकर्ते डिजिटल युगात मात्र पडद्याआड गेले आहेत. कारण आता मतदारांशी संवाद साधण्यासाठी राजकीय पक्षांनी एलईडी स्क्रीन्सद्वारे प्रचार सुरू केला आहे. त्यात प्रमुख नेत्यांचे आवाहन, हिंदी-मराठी गाण्यांच्या चालींवरील प्रचारगीते मतदारांना चांगलेच आकर्षित करत आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आपापल्या मतदारसंघातील अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रत्येक पक्ष उमेदवारांकडून प्रयत्न सुरू आहेत. कमी कालावधीत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांकडून डिजिटल प्रचारावर भर दिला जात आहे. आपल्या खास भाषण शैलीमुळे लोकांवर प्रभाव टाकणारे बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी, राज ठाकरे, अजित पवार, शरद पवार यांच्यासह प्रमुख नेत्यांची भाषणे, मतदारांना आवाहन करणारी चित्रफीत दाखवली जात आहे.
राजकीय पक्षांचा विकासनामा असो की, सत्ताधारी पक्षाने केलेल्या घोटाळ्यांची यादी असो, हे सर्व स्क्रीनवरून दाखवले जात आहे. विशेषत: सायंकाळच्या वेळेस गर्दीच्या ठिकाणी या स्क्रीन लावलेल्या प्रचाराची वाहने उभी केली जात आहेत. गाडीवर असणा-या साऊंड सिस्टिममुळे नेता आपल्याशीच संवाद साधत असल्याचा भास होतो. त्यामुळे आबालवृद्धांसह सर्वांनाच डिजिटल प्रचाराने प्रभावित केले आहे. अशा आधुनिक प्रचारामुळे पारंपरिक मतदाराबरोबर आजच्या टेक्नोसॅव्ही असणाऱ्या तरुण मतदारांनाही डिजिटल प्रचाराद्वारे आपल्याकडे वळविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांकडून केला जात आहे.