आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एचआयव्ही बाधितांनी केली धमाल मस्ती, बालकांना मिळाली कपडे आणि मिठाईची भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जन्मत:च एचआयव्ही त्यांच्या पाचवीला पूजला गेलाय.. अशातच नकारात्मक सामाजिक मानसिकतेमुळे ते पुरते खचतात.. समाजाकडून होणार्‍या हेटाळणीमुळे या चिमुरड्यांच्या दु:खाला पारावार उरत नाही. या पार्श्वभूमीवर महिंद्रा अँण्ड महिंद्रा यश फाउंडेशनने पुढाकार घेतला व त्यांच्याही चेहर्‍यावर हास्य फुलले. या मुलांसमवेत साजरी केलेली दिवाळी अद्वितीय ठरली!

महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनी व यश फाउंडेशन यांनी या बालकांचे पालनपोषण व आरोग्याची जबाबदारी घेतल्याने त्यांच्या वेदनांवर मायेची फुंकर घातली जाते आहे. या बालकांचा सामाजिक सहभाग वाढावा, सण-उत्सवात त्यांच्या मनात एकाकीपणाची भावना येऊ नये, या उद्देशाने संस्थेतर्फे दरवर्षी दिवाळी साजरी केली जाते. शुक्रवारी जिल्हा होमगार्ड कार्यालयाच्या आवारात या बालकांनी दिवाळी साजरी केली. या वेळी महिंद्रा अँण्ड महिंद्राचे उपाध्यक्ष हिरामण आहेर, सहायक पोलिस आयुक्त रूपाली अंबुरे, होमगार्डचे जिल्हा समन्वयक जितेंद्र कर्डिले, कर्नल सी. एन. बॅनर्जी, मनीष शेटे आदी उपस्थित होते. या वेळी अंबुरे यांनी एचआयव्ही बाधित बालकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. हिरामण आहेर यांनी एचआयव्ही बाधितांना रोजगाराची संधी मिळवून देण्याची गरज व्यक्त केली. यश फाउंडेशनचे रवींद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले. चंदा थेटे यांनी आभार मानले. या वेळी बालकांना फटाके, मिठाई व कपड्यांचे वाटप केले गेले. चिमुरड्यांनी दिवसभर धमाल मस्ती केली. चंद्रमा पाटील, जितेंद्र पाटील, लक्ष्मण जामदार, सोनाली मोरे, अरुण गोधड, राजेंद्र आहेर, प्रशांत गडाख आदी उपस्थित होते. जिल्ह्यात सुमारे 600 बालक जन्मत:च एचआयव्हीबाधित आहेत. एचआयव्हीबाबत पुरेशी जागृती नसल्याने या बालकांच्या नशिबी परवड येते. ती टाळण्यासाठी या संस्थांनी पुढाकार घेतला आहे.

लुंगी डान्सची धूम
उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी नाच-गाण्याची धमाल मजा लुटली. विशेषत: ‘लुंगी डान्स’ गाण्यावर तर मुले देहभान विसरून नाचली. ढिंकचिका ढिंकचिका, चिपका ले सैया फेविकॉलसे यांसारख्या अनेक गाण्यांवर मुलांनी नृत्याविष्कार सादर केला. दुसरीकडे एचआयव्ही बाधित महिलांच्या बचतगटानेही विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली.