आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • HIV Test Include In Police Recruitment News In Marathi

एचआयव्ही टेस्टचा ‘खाक्या’ : पोलिस भरतीपूर्व एचआयव्ही चाचणीसाठी उमेदवारांची गर्दी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ग्रामीण पोलिस दलाने ‘फिटनेस’चे कारण देत, नुकत्याच भरती झालेल्या पोलिसांना वैद्यकीय तपासणीत ‘एड्स’ तपासणी करण्याचा ‘खाक्या’ दाखविल्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. गेल्या दोन दिवसात 50 पोलिसांनी या तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात रांगा लावून रक्त नमुनेही दिले. अत्यंत संवेदनशील व नाजूक विषय मानल्या जाणार्‍या आणि विशेष म्हणजे रुग्ण संमतीशिवाय एड्सची चाचणी करण्यास मज्जाव असताना तपासणीची केलेली सक्ती खुद्द जिल्हा रुग्णालयाच्या वर्तुळातच आश्चर्याचा विषय ठरली.

महाराष्ट्र नागरी सेवा शर्ती नियम 1981 प्रमाणे दृष्टिदोष, तिरळेपणा, रातांधळेपणा, वर्णांधता, गुडघ्यास गुडघे लागणे, तोतरेपणा आदी चाचण्या बंधनकारक आहे. सरकारी सेवेत दाखल झाल्यावर नियुक्तीपूर्वी या तपासण्या जिल्हा रुग्णालयातून करून घेणे उमेदवारास अनिवार्य असते. त्यासाठी संबंधित विभागाचे प्रमुख जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र देतात. त्यानुसार चाचण्या करून त्याचा अहवाल दिला जातो. या चाचण्यांमध्ये प्रथमच एचआयव्ही अर्थातच एड्सचाही समावेश केल्याने उमेदवार गडबडून गेले आहेत. मुळात चाचणीसाठी कोणाचाही आक्षेप नाही. मात्र, जिल्हा रुग्णालयात रांग लावून रक्त नमुने द्यावे लागल्याने गोपनीयतेचा भंग होण्याची भीती खासगीत व्यक्त होत होती. याबरोबरच इच्छा नसतानाही केवळ नोकरीसाठी चाचणी करावी लागत असल्याचेही उमेदवारांनी सांगितले.

‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने माहिती घेतली असता पोलिस अधीक्षक संजय मोहिते हेच या चाचणीबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसले. त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून माहिती घ्या असे सांगितले. मात्र, शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांना विचारले असता, त्यांनी पोलिस अधीक्षक (मुख्यालय) देवराज यांचे पत्र दाखवत त्यात एचआयव्ही चाचणी करून घेण्याचे नमूद असल्याचे दाखवले. त्यानंतर मोहितेंनी अन्य जिल्ह्यातील पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधून याबाबत विचारले असता अशी चाचणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘दिव्य मराठी’शी बोलताना मोहिते यांनी याबाबत शासन आदेशच असल्याचे सांगितले. मात्र, या आदेशाची प्रत माहिती अधिकारात किंवा संकेतस्थळावर मिळेल असे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.
तपासणी करण्याबाबत आमची सक्ती नाही
एड्सविषयीची तपासणी स्वेच्छेची असून, आमची कोणावरही सक्ती नाही. पोलिसांच्या पत्रानुसार आम्ही चाचणी करून दिली आहे. पोलिसांची शारिरीक क्षमता कळण्यासाठी पोलिस यंत्रणेस ही तपासणी हवी असेल. डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक

स्वतंत्र तपासणीच्या पर्यायावर फुली
जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली जाते. एड्स आढळला तर नोकरीतून कमी केले जात नाही. त्यामुळे जर ही चाचणी स्वतंत्ररीत्या जिल्हा रुग्णालयातून ठराविक मुदतीत करून घेण्याचा पर्याय दिला असता तर, गोपनीयतेचा भंग होण्याची भीती राहिली नसती. एक प्रशिक्षणार्थी, उमेदवार

यासाठी चाचणीचा केला अट्टहास
पोलिसांचे काम क ष्टप्रद असल्याने उमेदवाराचा फिटनेस कसा आहे हे बघण्यासाठी विविध चाचण्या असतात. त्यानुसार उमेदवाराला नोकरीत जबाबदारी दिली जाते असा दावा पोलिस अधिकार्‍यांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र, चाचणीत जे बाधित असतील त्यांना सेवेतून कमी करणे व दुय्यम जबाबदारी देण्याची तरतूद नसल्याने हा अट्टहास का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खासगी बँकांकडूनही चाचणी सक्तीची
जिल्हा रुग्णालयातील रक्त तपासणी केंद्रात खासगी बॅँकांकडूनही अलीकडे सक्तीने उमेदवारांना नियुक्तीपूर्व एड्स तपासणीसाठी पाठवले जात असल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले. मागील सिंहस्थात परराज्यातून आलेल्या सीआरपीएफ जवानांचीही अशी चाचणी केली गेली. त्यात पाच ते सहा जण एड्सबाधित असल्याचेही निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले.