आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बम बम भोले’च्या घोषात धर्मध्वजारोहण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्र्यंबकेश्वर - हिरवाईनेनटलेल्या त्र्यंबकनगरीत श्रावणसरी झेलत ‘बम बम भोले’च्या जयजयकारात श्री पंचदशनाम निरंजनी आनंद आखाड्याचे धर्मध्वजारोहण झाले. विशेष म्हणजे, या सोहळ्यापूर्वी निरंजनी आखाड्याच्या सजविलेल्या नूतन इमारतीवर स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा फडकविण्यात आला. साधू-महंतांनी तिरंग्याला अभिवादन करून मानवंदना दिली.

कुंभमेळ्यात दशनामी नागा संन्यासी आखाड्याच्या ध्वजारोहणास अनन्यसाधारण महत्त्व आहे. धर्मध्वजा रक्षणासाठी त्या काळी नागादल अहोरात्र सतर्क राहात असे. सनातन धर्माचा हा ध्वज कायम फडकत राहावा, ही त्यामागची भावना होती. बदलत्या काळाबरोबर सत्तांतरे झाली. त्यातून आता या आखाड्यांत धर्मकार्य सुरू राहावे परंपरा लोप पाऊ नये म्हणूनही ध्वजारोहणाचा सोहळा आयोजित केला जातो. याप्रमाणे शनिवारी सकाळी साडेआठ वाजता निरंजनी आखाड्यात, तर आनंद आखाड्यात सव्वानऊ वाजता मंगलमय वातावरणात ध्वजारोहण सोहळा पार पडला.

निरंजनी आखाड्यात महंत रामानंद पुरी, दिगंबर आशिष गिरी, आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी महाराज यांसह विविध आखाड्यांचे साधू, महंत, संन्यासी, राजकीय सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांचे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. निरंजनी आखाड्याची इष्टदेवता कार्तिकस्वामी मंदिरात या आखाड्याचे पुरोहित प्रमोद पद्माकर बाळकृष्ण जोशी यांनी गणेशपूजनासह नवग्रह पूजाविधी केला. सर्व पीठांच्या पूजा झाल्यानंतर ५२ फुटी ध्वजाचे पूजन करण्यात आले. ध्वजाच्या अग्रभागी मोरपिसे, तर ध्वजपताकेत फुलांच्या पाकळ्या ठेवण्यात येऊन पुष्पहारांनी सजविलेल्या दोरखंडाच्या साहाय्याने जयघोषात ध्वजारोहण झाले. त्यानंतर उपस्थितांना भजिविलेली हरभराडाळ, गूळ आणि पेढे यांचे प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले.

इष्टदेवता सूर्यनारायणाच्या पूजनानंतर फडकविला धर्मध्वज
निरंजनीचासहयोगी आखाडा असलेल्या श्री पंचायती आनंद आखाड्यात साडेआठ वाजेनंतर ध्वजारोहणाची लगबग सुरू झाली. या आखाड्याच्या रिंगरोड स्वामी समर्थ केंद्रासमोरील नूतन जागेत सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. शुक्रवारीच ध्वजास सूत बंद बांधून रंगरंगोटी झाली होती. आखाड्याची देवता श्री सूर्यनारायणाची पूजा होऊन ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला.
याप्रसंगी या आखाड्याचे प्रमुख तथा षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत श्री सागरानंद सरस्वती, सचिव श्री शंकरानंद सरस्वती, गणेशानंद सरस्वती, महंत धनराजगिरी, महंत कैलास पुरी, महंत लक्ष्मण भारती, कारभारी माधवगिरी, गिरजिानंद सरस्वती, भैरवगिरी, सुरेश पुरी आदींसह देश-विदेशातील साधू-संन्यासी उपस्थित होते. पद्माकर जोशी यांनी पौरोहित्य केले.