आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्चअखेरमुळे सुट्या रद्द

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मार्चअखेरमुळे सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये कामाची लगबग सुरू आहे. आलेल्या सर्वच निधी खर्च होण्याची शक्यता कमीच असल्याने परत जाऊ नये, यासाठी किमान तो निधी वितरित करण्याची सर्वच विभागांची लगीन घाई सुरू होती. त्यामुळे गुड फ्रायडेची शासकीय सुटी असतानाही बहुतांशी कार्यालये सुरूच असल्याचे चित्र शहरात दिसले. आता सोमवारपर्यंत ही सर्वच कार्यालये सुरूच राहणार आहेत.

2012 या वर्षासाठी मंजूर झालेली आर्थिक तरतूद शासनाकडून अखेरच्या टप्प्यात वितरित केली जात आहे. तसेच बिले कोषागारात जमा करणे आणि विविध विभागांच्या खात्यावर निधी जमा करण्याचे काम सर्वच शासकीय विभागांमार्फत सुरू होते. तसेच शासनाकडून काही निधी रात्री उशिरापर्यंत वितरित होण्याची शक्यता असल्याने सुटीचा विचार न करता कार्यालयीन कामकाज नियमित सुरू होते. सर्व कार्यालयांमध्ये महत्त्वाचे अधिकारी हजर होते.

अबकारी कर भरण्यासाठी कार्यालये राहणार सुरू
केंद्रीय उत्पादन शुल्क आणि अबकारी कराचा भरणा करण्यासाठी 31 मार्चला सुटी असली, तरी कार्यालये सुरू राहणार आहे. नाशिक विभागाचे आयुक्त ए.के.पांडे यांनी या संदर्भात विशेष आदेशान्वये याची माहिती शहरातील उद्योजक-व्यापारी संघटनांना विशेष नोटिसीद्वारे दिली आहे. यामुळे चालू आर्थिक वर्षाकरिताचा हा कर भरण्याची 31 मार्चची अंतिम मुदत टळू नये याकरिता व्यापार्‍यांना दिलासा मिळाला आहे. विक्रीकराचा भरणा ऑनलाइन होत असल्याने या आठवड्यात आलेल्या सुट्यांची अडचण या करभरण्यासंदर्भात नव्हती. मात्र, केंद्रीय अबकारी कर भरण्यासाठी आलेल्या चार सुट्यांमुळे उद्योजक -व्यापार्‍यांना वेळेत करभरणा न केल्यास दंडास सामोरे जावे लागणार असल्याचे संबंधित विभागाच्या तक्रार निवारण समितीने लक्षात आणून दिले होते, त्यानुसार दोन दिवसांपूर्वीच या विभागाने आदेश काढले आहेत. यानुसार 30 मार्चला विकेंड, तर 31 मार्चची रविवारची सुटी लक्षात घेण्यात येऊन या दिवशीही कामकाज सुरू ठेवले आहे. केंद्रीय उत्पादन शुल्क आणि अबकारी कर विभागाचे कार्यालयही सुरू राहणार आहे.

‘गुड फ्रायडे’ला सुरू असलेली कार्यालये
जिल्हाधिकारी कार्यालयातील कोषागार विभाग, नियोजन विभाग, ग्रामपंचायत शाखा, मदत व पुनर्वसन विभाग, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, आदिवासी विकास विभाग, यांसह शहरातील सर्वच महत्त्वाची शासकीय कार्यालये सुरूच होती.

आरटीओ कार्यालयही सुरू
प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) रविवारी सुरू राहणार आहे. या दिवशी नवीन वाहन नोंदणी व कर भरण्यासाठी संबंधित अधिकारी सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. लोकांनी या सोयीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत खरटमल यांनी केले आहे.

31 पर्यंत भरा सेवाकर
सेवा करदात्यांना 31 मार्चपर्यंत कर भरणा करावा, अन्यथा व्याज वा दंडात्मक कारवाई होईल, असे आयकर विभागाने कळवले आहे. करदात्यांच्या सोयीसाठी केंद्रीय उत्पादन विभाग व सीमा शुल्कची नाशिक विभागातील सर्व कार्यालये, तसेच सर्व राष्ट्रीयीकृत बँका 29, 30 व 31 मार्चला सुरू राहणार आहेत, अशी माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

बँका शनिवारी 8 वाजेपर्यंत सुरू राहणार
मार्चअखेरमुळे शनिवारी (30 मार्च 2013) रात्री 8 वाजेपर्यत सर्वच बॅँका सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. त्यात स्टेट बॅँक कोषागार शाखा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिकरोड शाखा, देवळाली, देना बॅँकेची सुरगाणा शाखा, तसेच तालुका स्तरावरील स्टेट बॅँकेसह शासकीय व्यवहार असलेल्या सर्व बॅँक सुरू राहणार आहेत.