आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एचआयव्हीग्रस्त बालकांनाही मिळणार हक्काचे घर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘एड्स छुनेसे नहीं फैलता’ हे वाक्य विविध व्यासपीठांवर सांगितले जाते खरे; परंतु अजूनही एचआयव्ही बाधित रुग्णांना पूर्णार्थाने स्वीकारण्यास समाज तयार नाही. आई-वडिलांकडून संक्रमित झालेल्या एचआयव्ही बाधित बालकांची स्थिती तर अतिशय वाईट आहे. अशा बालकांना दत्तक प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी ‘बाल आशा ’ संस्थेने पॉपीलॉॅन प्रकल्प सुरू केला. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून एचआयव्हीशी संबंधित संस्थांना ‘बाल आशा संस्थेने पत्र पाठवून एचआयव्हीग्रस्त अनाथ बालकांची माहिती मागविली आहे.

एचआयव्हीग्रस्तांना झालेले अपत्य एचआयव्ही बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. कालांतराने अशा पालकांचे निधन झाल्याने ही बालके अनाथ होतात. सामाजिक अस्वीकृतीमुळे या बालकांना मरणयातना भोगाव्या लागतात ही बाब ओळखून मुंबईतील बाल आशा ट्रस्टने पॅापीलॉन प्रकल्प सुरू केला आहे.

एचआयव्हीग्रस्त बालिकेला मिळाले अमेरिकेत घर : एचआयव्ही बाधित बालकाला केवळ भारतातच नाही तर परदेशातही दत्तक देणे आता कायद्याने शक्य झाले आहे. बाल आशा संस्थेतील एका एचआयव्ही बाधित बालिकेला दोन महिन्यापूर्वी अमेरिकेतील एका दांपत्याने दत्तक घेतले आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधित बालकांच्या रक्तातील सीडी फोर घटकाची नियमित तपासणी करण्यात येते.

भिंतींच्या पलीकडील घर
एचआयव्ही बाधित अनाथ बालकांना अनाथाश्रम किंवा तत्सम संस्थेच्या भिंतींमध्येच जीवन व्यतित करावे लागते. या भिंतीच्या पलीकडे जाऊन बाधितांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी पॉपीलॅन प्रकल्पाचा उपयोग होणार आहे. संजय अरोरा, कार्यकारी अधिकारी, बाल आशा ट्रस्ट

काय आहे पॉपीलॉन
फ्रान्समध्ये पॉपीलॉन या सैनिकाची गाथा प्रचलित आहे. हा सैनिक अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोच्या जेलमध्ये बंद होता. तेथून पळ काढणे अशक्य असतानाही त्याने पलायन केले. याच धर्तीवर एचआयव्ही बाधित मुलांनीही अनाथ राहण्यापासून पळ काढावा, असा सकारात्मक संदेश यात आहे.