आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्दिष्टपूर्तीची चिंता: घरपट्टी, पाणीपट्टीचे बिल वाटपच थांबले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या एकत्रीकरणाचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असून, या एकत्रीकरणासाठी आवश्यक सॉफ्टवेअर बदलणे सुरू असल्याने गेल्या चार महिन्यांपासून देयकांचे वाटपच झाले नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. देयके वाटपाच्या विलंबामुळे संबंधित विभागाचे पुढील वेळापत्रकही कोलमाडणार आहे. त्यामुळे उद्दिष्टपूर्ती कशी करणार, अशी चिंता विभागातील कर्मचार्‍यांना लागली आहे.

घरपट्टी आणि पाणीपट्टीची विभिन्न देयके वितरित केली जात असल्यामुळे ही देयके भरण्यासाठी नागरिकांना दोन वेळेला विभागीय कार्यालयांमध्ये जावे लागते. तसेच, या दोन्ही कामांसाठी मनुष्यबळाचाही मोठय़ा प्रमाणात वापर होतो. या पार्श्वभूमीवर घरपट्टी आणि पाणीपट्टीचे एकत्रीकरण करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. एप्रिलपासून घरपट्टी व पाणीपट्टी एकत्र करण्याचे काम सुरू झाल्याने तसेच मनपाने घरपट्टी व पाणीपट्टीचे सॉफ्टवेअर बदलल्याने देयके वितरणाचे काम बंद आहे.

महापालिकेची कोटींची थकबाकी
घरपट्टीचे देयके हे दरवर्षी एप्रिल महिन्यात वितरित होतात. तसेच, पाणीपट्टीची देयके ही दर दोन महिन्यांत वितरित होतात. व्यावसायिक नळपट्टीचे देयके हे दर महिन्यात वाटप करण्यात येते; मात्र चार महिने उलटूनही देयकांचे वाटप न झाल्याने कोट्यवधींची थकबाकी झाली आहे.

मिळकतधारकांच्या वाढणार अडचणी
शहरातील मिळकतधारकांना देण्यात येणारे घरपट्टीचे देयक हे वर्षभराचे असते. त्यामुळे देयक मिळाल्यानंतर घरपट्टीच्या रकमेची तजवीज करण्यासाठी मिळकतधारक प्रयत्न करत असतात. नेमके देयक मिळणार नसल्याने त्यांच्यापुढील अडचणी वाढल्या असून, परिणामी घरपट्टी भरण्यास विलंब होणार आहे.

शहरातील करधारक
नाशिक शहरात एकूण 3 लाख 93 हजार मिळकतधारक आहेत, तर 4 लाख 91 हजार नळधारक आहेत. यापैकी कोणालाही घरपट्टी व पाणीपट्टीची देयके वितरित करण्यात आलेली नाहीत. सॉफ्टवेअर बदलाच्या प्रक्रियेमुळे देयके तयार करण्याचे काम ठप्प झाले आहे. परिणामी मिळकतधारकांना देयकांचे वाटप होऊ शकलेले नाही.

आता कर प्रभावीपणे वसूल करा
नुकतीच शासनाने महापालिकेची जकात बंद केलेली असून, एलबीटीबाबतही गोंधळ कायम आहे. त्याचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावर झालेला आहे. अशा परिस्थितीत घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली प्रभावीपणे होणे क्रमप्राप्त आहे. परंतु, त्यातही अडथळे येत आहेत.

सॉफ्टवेअर बदलल्याने अडचण
घरपट्टी व पाणीपट्टी एकत्र करण्यासाठी वेळ लागत आहे. तसेच, देयके काढणारे सॉफ्टवेअर बदल्याने थोडी अडचण येत होती. देयकाचे स्वरूप बदल्याने आता पावती नवीन प्रकारची राहणार आहे. लवकरच नवीन प्रकारच्या देयकांचे वाटप सुरू होईल.
-रोहिदास बहिराम, उपायुक्त, कर विभाग

एकदम बिल भरणे शक्य नाही
यंदा आमच्या सोसायटीला पाणीबिल मिळालेले नाही. एकदम बिल आल्यास ते भरणे सोसायटीला शक्य होणार नाही. महापालिकेने बिलाचे वाटप वेळेवर करायला हवे.
-संजय महाले, नागरिक