नाशिक- होमिओपॅथी डॉक्टरांचा आरोग्य सेवेत समावेश करण्याच्या प्रलंबित मागणीसाठी शहरातील मोतीवाला महाविद्यालय येथील डॉक्टरांनीही निदर्शने करीत शासनाचा निषेध केला. महाराष्ट्र वगळता अन्य राज्यांत होमिओपॅथी डॉक्टरांचा आरोग्य सेवेत समावेश झाला असल्याने, या मागणीच्या पाठपुराव्यासाठी 'होमिओपॅथी डॉक्टर्स व विद्यार्थी अन्याय निवारण समिती'ने नागपूर येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी स्थानिक पातळीवरही डॉक्टरांकडून निदर्शने करण्यात आली.
देशभरात 207, तर महाराष्ट्रात 48 वैद्यकीय महाविद्यालये सुरू आहेत. त्यातील तीन लाख प्रॅक्टिशनर्सपैकी 57 हजार होमिओपॅथिक डॉक्टर्स आहेत. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, ओरिसा, दिल्ली, आसाम येथे शासनाची 33 महाविद्यालये असून, काही ठिकाणी स्वतंत्र संचालनालये आहेत. मात्र, महाराष्ट्र, राजस्थान व दिल्ली शासनाच्या वतीने उपसंचालकांद्वारे होमिओपॅथीचा कार्यभार सांभाळला जातो आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र वगळता इतर राज्यांत होमिओपॅथी डॉक्टरांना शासकीय सेवेत सामावून घेतले जात आहे. याउलट महाराष्ट्रात मात्र शासनाचे स्वत:चे एकही महाविद्यालय नसून होमिओपॅथी चिकित्सेकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानामध्येही होमिओपॅथीबाबत दुजाभाव करण्यात येतो. याकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र होमिओपॅथी समितीचे डॉ. अरुण भस्मे हे नागपूर येथे आमरण उपोषणास बसले होते. उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून, त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोतीवाला महाविद्यालयातील डॉक्टरांनी शनिवारी संपूर्ण दिवसभर निदर्शने करत महाराष्ट्र सरकारचा निषेध केला. या आंदोलनात डॉ. एफ. एफ. मोतीवाला, डॉ. स्वानंद शुक्ला, डॉ. लक्ष्मीकांत पाठक, डॉ. गणेश कुमावत, डॉ. दत्ता बहिकरे, डॉ. सचिन मोरे यांच्यासह महाविद्यालयातील 521 डॉक्टर व 40 प्राध्यापक सहभागी झाले होते.