आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशेचा क‍िरण : माझी मंदाताई मला भेटली..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ‘‘बर्‍याच दिवसांपासून मंदाताईला शोधत होतो. ‘दिव्य मराठी’तील वृत्तामुळे माझी बहीण मला भेटली. 50 वर्षांपूर्वीच्या आठवणी डोळ्यांसमोरून सरकल्या..’’ उद्योगपती सुधीर पुरंदरे खूप भावनिक झाले होते. त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.

नॅशनल उर्दू हायस्कूलच्या निवृत्त विद्यार्थीप्रिय शिक्षिका मंदाकिनी उजागरे यांच्यावर स्मृतिभ्रंशामुळे वणवण भटकण्याची वेळ आली असल्यासंदर्भातील वृत्त ‘दिव्य मराठी’ने मंगळवारी प्रसिद्ध केले होते. ते वाचल्यानंतर पुरंदरे यांना त्यांचे बालपण आठवले, ‘‘सन 1953 ते 59 याकाळात पुरंदरे वाड्याजवळील (आताच्या राजीव गांधी भवनची जागा) आमराईमध्ये आम्हा सर्व भावंडांना ती खेळवायची. मी तिच्यापेक्षा आठ वर्षांनी लहान.. तिचा लहानगा सुधू. पुढे ती नॅशनल हायस्कूलमध्ये शिक्षिका झाली. भेटी कमी होत गेल्या. नंतर तिच्या मेंदूवर दोन शस्त्रक्रिया झाल्या, तेव्हा इंदिरानगरला घर घेण्यासाठीही मदत केली. कामाच्या व्यापात पुढे भेटी आणखी कमी झाल्या. तेव्हापासून आजपर्यंत मंदाताईचा शोध घेत होतो. आता ती भेटली आहे. तिच्यावरील कठीण काळात मदत करण्याची इच्छा आहे.’’

दरम्यान, उजागरे यांचे सहकारी मोना वैद, रेश्मा खान, शगुस्ता शेख, कलीम खान आदी त्यांच्या योग्य पालनपोषणासाठी प्रयत्न करीत आहेत. सामाजिक क्षेत्रातून त्यांना मदतीची इच्छा व्यक्त होत आहे.


त्यांची काळजी घेतोय
उजागरे यांना केवळ सहानुभूतीची गरज असून सेंटरमध्ये त्यांची योग्य सेवा करण्यात येत आहे. एक दिवसामध्ये त्यांच्यात खूप बदल झाला आहे. अमोल गायकवाड, शबनम मनियार, प्रणव गांगुर्डे त्यांची काळजी घेत आहेत. भेटण्यास आलेल्यांशी त्या इंग्रजी, हिंदी व मराठीत संवाद साधतात. गणेश पाटील / सतीश सोनार, कीर्ती केअर सेंटर