नाशिक - मकरसंक्रांतीचा सण जिल्हा रुग्णालयाने शनिवारी दाखल रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना तिळगूळ देतानाच रुग्णालय परिसरात स्वच्छतेचे आवाहन करत अागळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. सुटीचा दिवस असूनही जिल्हा शल्यचिकित्सकांसह वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी हा सण साजरा केला.
रुग्णालयात दाखल रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना मकरसंक्रांत साजरी करता येणार नसल्याने त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट जाणवत होती. रुग्णालयात असल्याने नववर्षातील पहिलाच सण साजरा करता येणार नसल्याची नाराजी रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांच्या चेहऱ्यावर असल्याचे पाहून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. होले यांनी हा उपक्रम हाती घेतला. त्यांनी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वॉर्डात दाखल रुग्णांना तिळगूळ वाटप केले. रुग्णांना भेटण्यास आलेल्या नातेवाइकांना तिळगूळ वाटप करत रुग्णालयात
स्वच्छतेचे आवाहनही केले.
या उपक्रमाबद्दल सर्वांनी डॉ. सुरेश जगदाळे यांचे अाभार मानले. विशेष म्हणजे महिन्याचा दुसरा शनिवार सुटीचा असूनही सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना पदाधिकारी या उपक्रमात सहभागी झाले होते.