आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संदर्भ सेवा रुग्णालयातील रेडिओलॉजी विभाग बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- संदर्भ सेवा रुग्णालयात रेडिओलॉजी विभागातील आठ कोटींचे मशीन गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने नाशिकसह विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नगर येथील रुग्णांची हेळसांड होत आहे.
सुरळीत वीजपुरवठय़ासाठी आवश्यक एक्स्प्रेस फीडर रुग्णालयात नसल्याने महागड्या यंत्रणांना त्याचा फटका बसत आहे. रुग्णालयात हृदय शल्यचिकित्सक, मूत्र शल्यचिकित्सक, रेडिओलॉजी अशा महत्त्वाच्या विभागात अनेक महागड्या यंत्रणा आहेत. एकट्या रेडिओलॉजी विभागात र्जमन बनावटीचे अद्ययावत असे आठ कोटींचे मशीन आहे. कॅन्सरच्या रुग्णांना क्ष-किरण उपचार पध्दतीसाठी या मशिनरीचा उपयोग होतो. हे सर्व विभाग बाराही महिने वातानुकूलित ठेवण्याची गरज असते. नव्याने निधीची तरतूद करून यंत्रणा दुरुस्तीसाठी मंजुरी मिळण्यास सहा-सहा महिने प्रतीक्षा करावी लागत असल्याने रुग्णांची परवड होत आहे.
रुग्णालयात सर्वाधिक गोरगरीब आणि सर्वसामान्य रुग्ण येत असतात. अनेकांकडे तर प्रवासासाठीदेखील पैसे नसतात. यामुळे अशा रुग्णांना मशिनरी बंद असल्याने हेलपाटे मारावे लागतात. सध्या संदर्भ सेवा रुग्णालयात केवळ एक डिझेल जनरेटर आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास या जनरेटरद्वारे रुग्णालयातील सर्वच विभागांना वीजपुरवठा होऊ शकत नाही. त्यामुळे त्याचाही परिणाम येथील यंत्रणांवर होत असल्याने रुग्णांच्या संतापास येथील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स आणि कर्मचार्‍यांना सामोरे जावे लागत असते. रुग्णालयात एक्स्प्रेस फीडर बसविण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा रुग्णालयाने शासनाकडे सादर केला होता. मात्र, त्यास शासनाकडून अद्याप कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्याने आहे त्या स्थितीतच रुग्णालयाचा कारभार सुरू आहे.