आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाव ईएसआय रुग्णालय ; औषधे मात्र खासगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी असलेल्या ईएसआय रुग्णालयात उपचारांसाठी जाणा-या रुग्णांना तेथील डॉक्टरांकडून बाहेरून महागडी औषधे विकत घेण्याच्या प्रिस्क्रिप्शन्स दिल्या जात असल्याचे आढळून आले आहे. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी पंधरा दिवसांपूर्वीच अशा प्रकारे बाहेरून औषधे आणायला रुग्णांना सांगितले जाऊ नये, असे आदेश दिलेले असतानाही या प्रकारे सक्ती केली जात असून, खासगी औषधविक्रेते आणि रुग्णालयातील डॉक्टर यांच्यात साटेलोटे असल्याची शक्यता कामगारांत व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना ईएसआय रुग्णालयाकडून दर्जाहीन उपचार मिळत असल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वीही करण्यात आलेल्या आहेत.
गुरुवारी सायंकाळी कामगार विकास मंचचे अध्यक्ष कैलास मोरे आणि त्यांच्या सहका-यांनी रुग्णांच्या नातेवाइकांनी केलेल्या तक्रारींनुसार रुग्णालयात जाऊन अधीक्षक डॉ. अरुण चव्हाण यांच्या लक्षात ही बाब आणून दिल्यानंतर त्यांनी संबंधित डॉक्टरांना याप्रकारे बाहेरून औषधे लिहून न देण्याची आदेश दिले.

‘अच्छे दिन’ केव्हा?
या रुग्णालयाची स्थिती केव्हा सुधारणार हाच मूळ प्रश्न आहे. केंद्र सरकारकडे हे रुग्णालय वर्ग केले, तर निश्चितच कामगारांकरिता चांगली आरोग्यसेवा उपलब्ध होईल. कैलास मोरे, अध्यक्ष, कामगार विकास मंच

आश्वासने अपूर्णच
ईएसआयचे आयुक्त मागील वर्षी नाशिकभेटीवर असताना त्यांनी जी आश्वासने दिली होती त्यापैकी काहीच पूर्ण झालेली नाहीत. साध्या दर बुधवारी घेण्याच्या बैठका घेण्याची तसदीदेखील घेतली जात नाही. मनीष कोठारी, अध्यक्ष, निमा

अहवाल मागविणार
ईएसआय रुग्णालयाला दोन दिवसांत भेट देऊन तेथील सद्य:स्थितीचा अहवाल मागविणार आहे. त्यानंतर चांगल्या सुविधा मिळवून देण्याकरिता केंद्र शासनाकडे मागणी करणार आहे. -हेमंत गोडसे, खासदार