आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेलच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा, पटेलरोड भागातही महापालिकेची वक्रदृष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरात खोळंबलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेवर पुन्हा जोर देत महापालिकेने गंजमाळ परिसरातील बेकायदेशीर बांधकामे नुकतीच उद्ध्वस्त केल्यानंतर शुक्रवारी पश्चिम विभागातील एन. डी. पटेलरोडवरील एका खासगी जागेत अनधिकृतपणे बांधलेले हॉटेलचे बांधकाम तोडण्यात आले. या कारवाईत पत्र्याचे शेड पक्क्या बांधकामाचा समावेश आहे. किरकोळ वाद वगळता ही मोहीम शांततेत पार पडली.

गेल्या काही दिवसांपासून थंडावलेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम महापालिकेकडून पुन्हा हाती घेण्यात आली आहे. पश्चिम विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास एन. डी. पटेलरोडवरील या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. पालिकेच्या नगररचना विभागाकडे आलेल्या तक्रारीची दखल घेऊन करण्यात आलेल्या या कारवाईत जनरल पोस्ट ऑफिसजवळ असलेल्या मराठा खानावळ या हॉटेलचे सर्व पक्के बांधकाम तोडण्यात आले. एन. डी. पटेलरोडवरील काही दुकानांचे बांधकाम अनधिकृत असून, त्याचीही लेखी तक्रार नागरिकांकडून करण्यात आलेली आहे.

त्या तक्रारींचीही दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून पालिकेकडे करण्यात आली होती. मात्र, नगररचना विभागाकडून फक्त या हॉटेलचेच अतिक्रमण काढण्याचे सांगितल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. या परिसरात अनेक इमारतींच्या पार्किंग आणि मोकळ्या जागांमध्येही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणांसह हॉटेल्स पानटपऱ्यांचे अतिक्रमण असूनदेखील त्यांच्याकडे अतिक्रमण विभागाकडून या मोहीमेदरम्यान दुर्लक्ष करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

या भागात कधी होणार कारवाई?
शिंगाडातलाव परिसरातील अतिक्रमण, रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे अनेकदा अग्निशमन दलाच्या येथील मुख्यालयातील वाहनांनाही अडथळा निर्माण होतो. फायर स्टेशनच्या दोन्ही बाजूंना १०० मीटर अंतरापर्यंत ‘नो पार्किंग झोन’ असावा, असा वाहतुकीचा नियम असतानाही व्यावसायिक, गॅरेजचालकांकडून त्याकडे दुर्लक्षच होत आहे. महापालिकेकडून छोट्या अतिक्रमणधारकांवर केवळ कारवाईचा देखावा केला जात आहे. मात्र, अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई कधी करणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

विभागातील बेकायदा बांधकामांवर कारवाई
पश्चिमविभागातअसलेल्या अनधिकृत बांधकामांसंदर्भात नगररचना विभागाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्या आहेत. सर्वप्रथम या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाईल. जयश्री सोनवणे, पश्चिमविभागीय अधिकारी, महापालिका