आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हौसिंग दरबार : ‘बिल्डर व्हॅट भरल्याशिवाय ताबा देत नाही, काय करू?’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ‘साहेब, आम्ही सोसायटीत फ्लॅट घेतला आहे. त्याचे फक्त साठेखत झाले आहे, बिल्डरने ताबा दिला; पण तो कागदोपत्री ताबा देत नाही. व्हॅटची 5 टक्के रक्कम भरा तरच ताबा देईन म्हणतोय. या प्रकरणी आम्ही काय करावे?’ यांसारख्या अनेक प्रश्नांवर सहकार विभागाच्या अधिकार्‍यांनी सर्मपक मार्गदर्शन केले. निमित्त होते, सहकार हौसिंग दरबारचे.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जुन्या इमारतीत जिल्हा उपनिबंधक बाजीराव शिंदे, तालुका निबंधक चंद्रशेखर बारी, नाशिक जिल्हा हौसिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष अँड. वसंतराव तोरवणे, सदस्य पां. भा. करंजकर, सहकार अधिकारी अरुण ढुमसे, सहायक सहकार अधिकारी लक्ष्मण गमे आदींच्या प्रमुख उपस्थितीत दरबार पार पडला.

बिल्डर फ्लॅटचा ताबा देत नाही?

- बिल्डर फ्लॅटचा कागदोपत्री ताबा व्हॅटची 5 टक्के रक्कम भरल्याशिवाय देत नाही, याबाबत गुरुपुष्यामृत सोसायटीतील सदस्यांनी प्रश्न विचारला असता, ‘व्हॅटचा विषय न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे बिल्डरला तसे पत्र द्या व इतर पैसे भरा. बिल्डर सहकार्य करीत नसेल तर सोसायटीच्या नोंदणीचा प्रस्ताव सहनिबंधक कार्यालयाकडे सादर करा, बिल्डर असहकार्यतेच्या तरतुदीनुसार ही सोसायटी स्थापन करता येईल’ असा सल्ला चंद्रशेखर बारी यांनी दिला.

सदस्यांच्या नावावर सोसायटी होईल?

- ‘बिल्डर आणि त्यांच्या मित्राने मिळून सोसायटी स्थापन केली. बिल्डरने मित्रालाच सोसायटीचा चेअरमन केले. पण, हा मित्र नाशिकमध्ये राहत नाही. सातबाराला याच व्यक्तीचे नाव आहे. सोसायटीतील सदस्यांच्या नावावर सोसायटी होईल का?’, असा प्रश्न साईनाथ सोसायटीच्या सदस्यांनी विचारला. त्यावर चेअरमनचे नाव वगळण्याबाबत सोसायटीतील सदस्यांनी तलाठय़ाला पत्र द्यावे, असे बारी यांनी सांगितले.

डीम्ड कन्व्हेयन्ससाठी काय करावे?

- ‘सोसायटीचे डीम्ड कन्व्हेयन्स करायचे आहे, काय करावे लागेल?’ असा प्रश्न विचारला असता, त्यावर उत्तर देताना अँड. वसंतराव तोरवणे म्हणाले की, हौसिंग सोसायटीतील 60 टक्के सदस्य त्यासाठीचा अर्ज जिल्हा उपनिबंधकांकडे करू शकतात. पॅराडाइज सोसायटीचे ऑडिट व्हावे आणि आक्षेपांची दखल घ्यावी, यासाठी तालुका निबंधकांकडे तक्रार दिली होती. त्यांनी लेखापरीक्षक नेमला, पण त्याने दिलेला अहवाल कोणत्या आधारावर तयार केला ते समजत नाही, अशी तक्रार आल्याने वरिष्ठ स्तरावर कार्यवाही करण्यासाठी तक्रारदार आणि संबंधित लेखापरीक्षक यांची समोरासमोर बैठक घेण्याचे बारी यांनी या वेळी आश्वासन दिले. सोसायटीची नोंदणी करणे, डीम्ड कन्व्हेयन्स करणे, तसेच व्हॅटसंबंधीच्या तक्रारी यंदा हौसिंग दरबारमध्ये नाशिककरांनी मांडल्या.

सहकारी संस्थांना स्वायत्तता
97 व्या घटनादुरुस्तीतील सहकार कायद्यातील बदल राज्य शासनानेही स्वीकारले आहेत. त्यात, सहकारी संस्थांना अधिक स्वायत्तता मिळणार असून, पारदर्शक कामकाज अपेक्षित आहे. सहकारी संस्थांची जबाबदारी कायद्यातील या बदलांमुळे वाढणार आहे. त्याचे भान ठेवून सहकारी हौसिंग सोसायट्यांतील सभासदांनी कामकाज करण्याची गरज जिल्हा उपनिबंधक बाजीराव शिंदे यांनी या वेळी व्यक्त केली.