आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपट पाहण्याची कला अवगत असणारी व्यक्तीच सिनेमाला न्याय देण्याचा प्रयत्न करते- गणेश मतकरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये गणेश मतकरी यांचा ‘सिनेमा कसा पहावा’ ही कार्यशाळा झाली. यात मतकरी यांनी सुरुवातीला ‘फिस्ट’ दाखवून या चित्रपटामध्ये त्यांना जाणवलेले मर्म विचारले. त्यावेळी कुणी सांगितले, हा लघुपट कुत्र्याच्या पिल्लावर आहे, कुणी सांगितले खाण्याच्या सवयीवर आहे, तर कुणी प्रेमकथेचा अंग हेरला. यानंतर मतकरी यांनी लघुपटाची चर्चा पुढे नेताना त्यात असलेले तीन अंक समजावून सांगितले. चित्रपट किंवा चित्रपटाची कथा पुढे साकारण्याचे टप्पे असतात. सिनेमा पाहताना सगळ्यात अगोदर सिनेमा गोष्ट म्हणून पहावा. नंतर जेव्हा चित्रपट ही कलाकृती म्हणून पाहण्याची आपली तयारी होते तेव्हा त्यातील बारकावे लक्षात घ्यावे. यामध्ये परफॉर्मन्स, एखाद्या अभिनेत्याचा त्याच्या भूमिकेला दिलेला न्याय लक्षात घेता त्याची ते पात्र साकारण्याची कला पाहता आली पाहिजे, समजून घेता आली पाहिजे. या बरोबर त्यांनी काही सिनेमाची उदाहरणे देऊन उपस्थितांना कोणत्या प्रकारच्या सिनेमामध्ये काय पहावे, याची माहितीही मतकरी यांनी दिली.
 
चित्रपट कसा पहावा, या सत्रामध्ये तल्लीन झालेल्या सिने रसिकांनी शेवटी ‘चेअरी टेल’ ही शॉर्ट फिल्म बघितली. यामध्ये एखादा विषय मांडण्यासाठी चित्रपटावर केलेले काम आणि विषयाला केंद्रस्थानी ठेवून त्या भोवती कोणत्याही संवादाशिवाय रचलेली कथा दाखवली गेली. त्यानंतर ‘लॉर्ड ऑफ वॉर’ या शॉर्ट फिल्मच्या टायटल ट्रॅकच्या माध्यमातून थीम, साऊंड आणि कॅमेरा या गोष्टींचे महत्व समजावून सांगण्यात अाले.
 
‘फिस्ट’ या वॉल्ट डिस्ने’च्या लघुपटाने सुरुवात झालेली ‘चित्रपट कसा पहावा’ ही कार्यशाळा थेट ‘इन शॅडो ऑफ डॉन’ या सिनेमापर्यंत जाऊन पोहाेचली. चित्रपट पाहण्याची कला अवगत असणारी व्यक्ती सिनेमाला खरा न्याय देऊ शकते. यावरून सुरू झालेल्या चर्चेचे रूपांतर शेवटी फॅली आणि अॅबियन्ससारख्या तांत्रिक गोष्टींत झाले, असे प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आणि अभ्यासक गणेश मतकरी यांनी सांगितले.
 
या चित्रपटांचा दिला संदर्भ : गणेशमतकरी यांच्या चर्चेमध्ये त्यांनी काही महत्वाच्या सिनेमाचा उल्लेख केला. यामध्ये सुरुवातीला फिस्ट, स्टार वॉर, हिचकॉक यांचे सिनेमे, चेअरी टेल, फाईट क्लब, ग्रॅव्हिटी, अस्तु, १२ अँग्री मेन, बर्ड मॅन, कोर्ट, ४०० ब्लॉ, इन शॅडो ऑफ डॉन, लॉर्ड ऑफ वॉर या सिनेमांचा संदर्भ दिला.

चित्रपट कसा पहावा
- कथेची रचना पहावी.
- सादरीकरण, भूमिकेला दिलेला न्याय पहावा.
- बारकावे अभ्यासण्यासाठी पहावा.
- लाईट, कॅमेरा आणि साऊंड लक्षात घ्यावे.
- गोष्ट म्हणून पहावा.
 
बातम्या आणखी आहेत...