आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हीच सांगा, आम्ही शाळेत जायचं कसं ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कुत्रे भुंकले... शेळी ओरडली... गाय आणि बैलाने हंबरडा फाेडला तरी मनात धस्स होतं... अंगावर काटा उभा राहतो... सकाळी घाबरत घाबरत आणि सारखे मागेपुढे पाहत अंगण झाडावे लागते...वाऱ्यामुळे उसाची पाने सळसळली तरी घरात पळ काढावा लागतो... अशी महिलांची स्थिती. तर शेतात जाताना पुरुष मंडळीही हातात काठी आणि जोडीला कुणाला तरी घेऊनच जातात.
शालेय विद्यार्थ्यांनी तर एवढी धास्ती घेतली आहे की एकटे-दुकटे शाळेत जाण्यापेक्षा बुट्टी मारणे पसंत करतात... वडीलधाऱ्यांना भीतियुक्त प्रतिप्रश्न करतात, ‘तुम्हीच सांगा, आम्ही जायचं कसं?’ ही दहशत अाहे निफाड तालुक्यातील शिंगवे, करंजगाव, चापडगाव या गावांतील बिबट्यांची. निफाड तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने पिण्यासाठी पाणीही असते. त्यामुळे या भागात बिबटे, लांडग्यांचा स्वैर संचार असताे. मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने हे हिंस्र प्राणी निष्पाप ग्रामस्थांच्या जिवावर उठले अाहेत. सहा महिन्यांपूर्वी ऊसतोड करणाऱ्या मजुराच्या मुलाला बिबट्याने जखमी केले. शनिवारी करंजगाव येथील सहा वर्षांचा विकी पिठे तर मंगळवारी शिंगवे येथील साडेचार वर्षीय दीपाली कोठे हिचा बिबट्याने बळी घेतला. त्यामुळे या पंचक्रोशीत दहशत निर्माण झाली असून नागरिकांचे जनजीवनच विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांना गटागटानेच काम करावे लागत आहे, तर महिला घराबाहेर पडण्याचे धाडसही करू शकत नाहीत.
दीपालीला तिच्या आजी आणि आजोबांसमोर बिबट्याने मानेला धरीत उसाच्या फडात सुमारे पन्नास ते साठ फूट फरपटत नेले. आजीने वाचवण्याचा प्रयत्न केला.आरडाओरड केली. परंतु प्रयत्न निष्फळ ठरले. वडिलांनी पाठलाग केला तर त्यांना रक्ताच्या थाराेळ्यात मुलीचा मृतदेहच हाती लागला. बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून सिन्नर, येवला, राजूर, अकोले, इगतपुरी या परिक्षेत्रामध्येच सुमारे दोनशेहून अधिक बिबटे असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.