आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hrishikesh Joshi Interview In Marathi, Marathi Actor, Marathi Film Industry, Nashik

मुलाखत: नटासाठी नाटक हाच पाया,हृषीकेश जोशीने नाटकासह उलगडले नाट्यजीवनाचे पैलू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - टीव्ही मालिका नाटकानंतर आल्या. 1843 मध्ये विष्णुदास भावेंनी पहिलं नाटक आणलं, म्हणजे त्याला 167 वर्षांची परंपरा आहे. त्यामुळेच रंगभूमीवरच्या नटाची विश्वासार्हता नेहमीच अधोरेखित होत गेली आहे. म्हणून कोणत्याही नटासाठी कोणतेही नाटक ही मूलभूत गरज आहे, किंबहुना नाटक हा पायाच आहे, असे मत अभिनेता, दिग्दर्शक हृषीकेश जोशी याने व्यक्त केले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे आयोजित अभिनय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी नाशिकचे ज्येष्ठ कलाकार सदानंद जोशी यांनी हृषीकेशची मुलाखत घेतली. यात त्याने विविध नाटकांसह स्वत:चा कलाप्रवास उलगडला..
0व्हायचं होतं क्रिकेटर, पण झालास कलाकार..
हो खरं आहे.. खरं तर शाळेत असताना कलेशी काहीही संबंध नव्हता. वडील कलाशिक्षक असल्याने घरात तसे वातावरण होते. पण, मी खो-खो, अँथलेटिक्सचे सगळे प्रकार खेळायचो, क्रिकेटचेही वेड होते. एका मोठय़ा सामन्याच्या वेळी मला आदल्या दिवशी सांगण्यात आलं की, तू या सामन्यात नाहीस. तेव्हापासून आजपर्यंत मग ‘नो क्रिकेट’. पण, वानखेडेवर आपला सामना रंगतोय हे स्वप्न कायम होतं. त्या काळी खेळात करिअर होऊ शकतं, अस काही नव्हतं. त्याचवेळी मी चौथीत असताना ‘अंकुर’ एकांकिकेसाठी मला विचारण्यात आलं. ती केलीही, त्यात मला अभिनयाचं बक्षीसही मिळालं. तेव्हा वातावरणही वेगळं होतं. मोठय़ा कलाकारांचं ‘इंटरॅक्शन’ होत असे, आता ते होत नाही. पुढे मग कॉलेजला नाटक, एकांकिका केल्याचं मेकअप वर्कशॉप केलं की, लगेत त्यासाठी म्हणून एकांकिका करायची, चोरून नाटकं करायची. हे सगळं करत असताना मी 3 वर्षे भिक्षुकी केली, गणित विषय शिकवला. पण नाटक काही सोडलं नाही.

0नाटकच करायचं तर मग ‘एनएसडी’त कशाला जायचं..
शाळेत नोकरी लागली होती, पण मन रमेना. मग चोरूनच एनएसडीचा फॉर्म भरला. कारण एनएसडीतून आलेल्या लोकांबद्दल ऐकलेलं होतं. मग आपणही जावं का? आपल्याला घेतील का? अशा अनेक शंकाकुशंका होत्या. पण फॉर्म भरल्यानंतर मुंबईहून इंटरव्ह्यूचा कॉल आला. पण त्यावेळी मला वडाळ्याला ज्ञानेश्वर विद्यालयात पर्मनंट नोकरी लागलेली होती. आता ती कशी सोडणार. 13 जूनला शाळेचा पहिला दिवस आणि 21 जूनला एनएसडीसाठी सिलेक्शन होतं. मी तेथील आपटे मॅडमला म्हटलं जर सिलेक्शन नाही, झालं तर पुन्हा शाळेत घ्याल. त्यांनीही अट टाकली की सिलेक्शन झालं, तर माझ्या शाळेसाठी काहीतरी उपयोग झाला पाहिजे. आणि मी एनएसडीत दाखल झालो. मला माहिती होतं त्यामुळे माझं आयुष्यच बदलणार होतं.

0‘नांदी’ हे एक प्रवास घडवतं. एक वेगळं नाट्य आहे. ते का करावंस वाटलं.
आपण गडकरी रंगायतनला नाटक करतो मग आपल्याला गडकरी माहिती असले पाहिजे अशा विचारांतून ‘नांदी’चा जन्म झाला आहे. 2003-2005 मध्ये मला सरकारकडून फेलोशिप मिळाली. मग ती चांगल्या कामासाठीच का घालवू नये म्हणून मी नाटकाच्या इतिहासात अक्षरश: हैदोस घातला. त्यात मला काही समान धागे सापडले. मी ते नाटक लिहिलं पण सुरुवातीला ते कोणी करायलाच तयार नव्हते. भारतीय चित्रपटावेळी मी ते मोहन आगाशेंना ऐकवलं होतं. ते सुबोध भावेनेही ऐकलं होते. पुढे बारामतीच्या नाट्यसंमेलनावेळी आपटेंनी मला ते करायची संधी दिली. हेच नाटक करायचं ठरलं. पण सुरुवातीला दिग्दर्शकच आला नाही. मग मीच दिग्दर्शक झालो आणि संमेलनात विविध गमती-जमती घडत नांदी सादर झालं.
सदानंद जोशींनी रसिकांच्या मनातल्या विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना कधी कोपरखळ्या तर कधी चिमटे घेत, स्वत:च्याच गमती-जमतीतून हृषीकेशने त्याचा नाट्यप्रवास उलगडला, तर रसिकही त्याला मनमुराद हसत प्रतिसाद देत होते आणि उत्तरोत्तर ही मुलाखत रंगतच गेली.

ऑस्कर मिळाल्यासारखंच
एका नाटकात मला सत्यदेव दुबेंनी बघितलं होतं. त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या वर्कशॉपसाठी स्वत:हून बोलावलं. हे म्हणजे माझ्यासाठी ऑस्कर मिळाल्यासारखंच झालं. पहिल्या दिवसापासूनच ‘ये तू उठ हे करून दाखव’, असं म्हणत तीन वाक्यही ते मला सलग म्हणू देत नसे. मी सुरुवातीला प्रचंड घाबरलो होतो. पण, तेच धडे खरे होते.