आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • HSC Exaam Duplicate Hall Ticket Now Avelible Online

हॉलतिकीट हरवले, काळजी करू नका; ऐनवेळीही ऑनलाइन हॉलतिकीट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अभ्यासाचं टेन्शन अन् परीक्षेचे दडपण मनावर असतानाच, ऐनवेळी परीक्षेच्या घाईगडबडीत हॉलतिकीट कुठेतरी हरवते. दोन दिवसांनी पेपरला जायचं असल्याने अभ्यास करायचा की, हॉलतिकीट शोधायचे, असा यक्षप्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकतो.
हॉलतिकीट हरवल्याने विद्यार्थी काळजी करीत बसतात. त्यामुळे अभ्यासाकडेही दुर्लक्ष होते. परंतु, आता हॉलतिकीट हरवल्यास काळजी करण्याची गरजच नाही. कारण आता विद्यार्थ्यांना ऑनलाइन हॉलतिकीट मिळणार असल्याने जुने हॉलतिकीट शोधत बसावे लागणार नाही.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने यंदा बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च २०१५ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षांची तयारी पूर्ण झाली आहे.
बारावीच्या परीक्षेसाठी अाठ केंद्रांवरून विद्यार्थ्यांना हॉलतिकिटांचे वाटप करण्यात आले आहे. परीक्षेच्या काळात हॉलतिकीट हरवल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागत होते. त्यातच ऐन परीक्षेच्या काळात पुन्हा हॉलतिकीट मिळवताना धावपळ करावी लागत होती.
हॉलतिकीट हरवल्याने विद्यार्थ्यांवर परीक्षेचे मोठं दडपण येत असल्याने विद्यार्थ्यांची परीक्षेच्या काळात गैरसोय होऊ नये यासाठी शिक्षण मंडळाने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मंडळाने दिलेल्या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना आपले हॉलतिकीट ऐनवेळीही डाउनलोड करता येईल.

असे मिळेल हॉलतिकीट...
राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन हॉलतिकीट मिळवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर महाविद्यालयांसाठी ऑनलाइन हॉलतिकीटसाठी लॉगीन करता येईल. त्यासाठी प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयास युजरनेम पासवर्ड देण्यात आला आहे.
ज्या विद्यार्थ्याचे हॉलतिकीट हरवले आहे, त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजशी संपर्क साधून हॉलतिकीट डाउनलोड करून घ्यायचे आहे. महत्त्वाचे म्हणजे, त्या हॉलतिकिटावर प्राचार्यांची स्वाक्षरी घेणे आवश्यक असणार आहे.

विभागातील दीड लाख विद्यार्थ्यांना दिलासा

बारावी परीक्षेसाठी नाशिक विभागीय मंडळातर्फे आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली अाहे. बारावीसाठी २०१ केंद्रांवर एक लाख ५२ हजार विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट राहणार आहेत. बारावीची १८ फेब्रुवारीपर्यंत प्रात्यक्षिक परीक्षा होईल, तर लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २६ मार्च या कालावधीत होईल. नाशिकमध्ये २९१, धुळे १६८, जळगाव २३२ तर नंदुरबारमध्ये ९५ अशी कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या असून, दीड लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या विद्यार्थ्यांना ऑनलाइन तिकिटाचा फायदा होईल.

मानसिक त्रास कमी होणार

^ऐनवेळीदेखील ऑनलाइन हॉलतिकीट उपलब्ध होण्याची सुविधा निश्चितच विद्यार्थ्यांच्या हिताची ठरणार आहे. हॉलतिकीट हरवल्यास विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ही सुविधा अत्यंत फायदेशीर असून, यामुळे परीक्षेच्या काळात जरी एखाद्या विद्यार्थ्याचे हॉलतिकीट हरवले, तरीदेखील ऐनवेळी त्या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. बी.जी. वाघ, प्राचार्य, सिडको कॉलेज

धावपळ करू नये

^परीक्षेच्या काळात हॉलतिकीट हरवल्यास त्या विद्यार्थ्याने काळजी करू नये. तसेच, पालकांनीही पाल्यावर दबाव आणू नये. हॉलतिकीट हरवल्यास ते कॉलेजमधून परत काढता येणार आहे. तसेच, मंडळाच्या कार्यालयातूनही ते मिळवता येईल. त्यामुळे विद्यार्थी पालकांनी धावपळ करण्याची कुठलीही गरज नाही. दत्तात्रयजगताप, विभागीय अध्यक्ष, माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक