आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीच्या हॉल तिकिटात बोर्डाकडून चुकाच चुका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या हॉल तिकिटामध्ये मोठय़ा प्रमाणावर चुका झाल्या आहेत. विशेष म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयांनी यातून अंग काढून घेतल्याने ऐन परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांना बोर्डाच्या कार्यालयात खेटा माराव्या लागत असल्याने हतबल झालेल्या विद्यार्थी अन् पालकांनी गुरुवारी थेट बोर्डाच्या कार्यालयातच गोंधळ घालत त्यात त्वरित
सुधारणेची मागणी केली.

वास्तविक हॉल तिकिटांमधील चुका महाविद्यालयांनीच सुधारणे आवश्यक असताना महाविद्यालये विद्यार्थ्यांना बोर्डाच्या कार्यालयात जाण्याचा सल्ला देत आहेत. बोर्डात जाऊनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने ऐन परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांचा वेळ अभ्यासाऐवजी हॉल तिकीट दुरुस्तीच्याच कामात जात असल्याने अखेर मनविसेसह पालक व विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त करीत माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष भगवान जगताप यांनाच धारेवर धरले. जगताप यांनी महाविद्यालय स्तरावरच समस्या मिटविण्याची व्यवस्था करण्याचे सांगत मंडळाकडे येण्याची आवश्यकता राहणार नसल्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी दालन सोडले.

या वेळी मनविसेचे अजिंक्य गिते, किरण कातोरे, संजय देवरे, राकेश परदेशी, जय कोतवाल, आनंद शिरसाठ यांच्यासह पालक व नाशिकरोडच्या बिटको महाविद्यालयातील 70, केटीएचएमचे 13 व जे. डी. सावंत महाविद्यालयातील 10 अशा चुका झालेले जवळपास 93 विद्यार्थी उपस्थित होते.

पवन गोहाड याच्या हॉल तिकिटावरील अक्षरी आसन क्रमांकातून शेवटचे आकडेच गायब आहेत. दुसर्‍या छायचित्रात सायली मैंद हिच्याऐवजी छायाचित्र व स्वाक्षरी दुसर्‍यांचेच आहे.

महाविद्यालयांतच दुरुस्ती
शहर, जिल्ह्यासह विभागातील विद्यार्थ्यांना बोर्डाच्या कार्यालयात यावे लागत असल्याने त्यांचा संपूर्ण दिवसच वाया जात आहे. त्याची दखल घेत मंडळाने तत्काळ परिपत्रक काढून महाविद्यालयांनाच समस्या सोडविण्याचे अधिकार दिले आहेत. विभागातील प्राचार्यांची तत्काळ बैठक बोलावली असून, विद्यार्थ्यांच्या समस्यांची सोडवणूक महाविद्यालयातच करण्याचे आदेश मंडळाचे विभागीय सचिव भगवान सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

या झाल्यात चुका
केटीएचएम महाविद्यालयाची विद्यार्थिनी सायली मैंद हिच्या हॉल तिकिटावर छायाचित्र व स्वाक्षरी दुसर्‍याचीच आहे. तुषार राजभोज या विद्यार्थ्यांचे भूगोल विषयासाठी मराठी माध्यम असताना त्यावर इंग्रजी माध्यम आले आहे. पवन गोहाड या ‘जे. डी. सावंत’च्या विद्यार्थ्याचा आसन क्रमांक एस 113311 असा असताना शेवटचा 11 अक्षरी प्रिंटच झालेला नाही. याप्रमाणे अनेक विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटामध्ये संदर्भाच्या विविध चुका झालेल्या आहेत.