आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिक ओळखपत्र छपाईसाठी प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- केंद्राने ओळखीचे प्रमाण म्हणून नागरिकांना दिलेल्या ‘आधार’ कार्डच्या धर्तीवर नागरिक ओळखपत्र (आयकार्ड) देण्याचा विचार करीत आहे. कोट्यवधीच्या संख्येतील ओळखपत्रांच्या छपाईची ऑर्डर मिळविण्यासाठी नाशिकरोडच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सरकारी ओळखपत्र भारतीय नागरिकत्वाचा पुरावा ठरणार असून, त्याची संपूर्ण छपाई प्लास्टिकमध्ये राहील. कामगारांची कार्यक्षमता, उत्साह व तयारीमुळे देशातील इतर प्रेसमध्ये छपाईची विभागणी न होता संपूर्ण ऑर्डर मिळविण्यासाठी आयएसपी प्रयत्नशील आहे. यापूर्वी ओळखपत्राच्या छपाईची रंगीत तालीम प्रेसमध्ये झाली. प्रेसमध्ये ऑफसेट व कलर प्रिंटिंग असल्याने प्लास्टिक प्रिंटिंगसाठी प्रेसला किमान चार मशीनची खरेदी करावी लागणार आहे. प्रदूषणविरहित विभागाची गरज असल्याने डिस्टलरी बिल्डिंगमध्ये छपाई विभाग कार्यान्वित केला जाण्याची शक्यता आहे.

साडेतीन कोटी ‘इ-पासपार्ट’ची ऑर्डर : अलीकडच्या काळात परदेशात पर्यटन व उच्च शिक्षणासाठी जाणार्‍यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने पासपोर्टला मोठय़ा प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यामुळे सरकारने इंडिया सिक्युरिटी प्रेसला प्रथमच आगाऊ तीन वर्षांत तीन कोटी 60 लाख ‘इ-पासपोर्ट’ छपाईची ऑर्डर दिली आहे.

सध्या प्रेसमध्ये 87 लाख पासपोर्ट प्रतींच्या छपाईचे काम अंतिम टप्प्यात असून, त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. शासनाकडून जुने पासपोर्ट जमा करून त्या बदल्यात इ-पासपोर्ट दिली जाण्याची शक्यता आहे. आधुनिक इ-पासपोर्टमध्ये चिप असल्याने तो कोणाला वाचता येणार नाही. शिवाय, बनावट पासपोर्ट छपाईला आळा बसणार आहे. प्रेसमध्ये 2015 मध्ये 1.10, 2016 मध्ये 1.20 आणि 2017 मध्ये 1.30 कोटी इ-पासपोर्ट छापण्यात येणार आहे.

‘एक्साइज सील’ची छपाई
केंद्रीय दस्तऐवजाबरोबर परराज्यातील शासकीय दस्तऐवजाच्या छपाईची ऑर्डर प्रेसला मिळाली आहे. पंजाबमधील ‘एक्साइज सील’ची छपाई येथे होणार आहे. या कामामुळे इतर राज्यातील छपाईचे काम प्रेसला मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

नवरत्न वर्गाकडे वाटचाल
दिवसागणिक होणार्‍या प्रगतीमुळे मिनीरत्न वर्गाकडून नवरत्न वर्गवारीकडे प्रेसची वेगाने वाटचाल सुरू आहे. करन्सीने चलन उत्पादनात गतवर्षी देशात प्रथम क्रमांक पटकाविला होता. यंदाही प्रेस अग्रस्थानी आहे. माधवराव लहांगे, उपाध्यक्ष, आयएसपी मजदूर संघ