आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गट उमेदवारीसाठी गटातटाचे राजकारण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घोटी - इगतपुरी तालुकास्तरीयदृष्ट्या संवेदनशील तालुका म्हणून समजला जातो. या तालुक्यात राजकारण करताना फारच विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो. यावेळी आश्चर्यकारक आरक्षण निघाल्याने राजकीय पक्षांपुढे तर मोठे पेच निर्माण झाले. जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षात गटागटाचे राजकारण सुरू झाले आहे, तर मातब्बरांचे पक्ष गटांकडे असल्याने गणाच्या उमेदवारीसाठी गणगण झाली असेच म्हणावे लागत आहे.
इगतपुरी तालुक्यात सर्वात विशेष लक्ष वाडीवºहे गटाकडे लागले आहे. वाडीवºहे व शिरसाठे हे दोन गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने विद्यमान जि.प. सदस्या सौ. गंगुबाई मेंगाळ यांना तूर्त थांबावे लागत आहे, तर सौ. अंजनाताई जाधव यांना गट बदलावा लागत असल्याची चर्चा आहे. वाडीवºहे गटातून कॉँग्रेसकडून अ‍ॅड. संदीप गुळवे यांचे नाव प्राधान्यक्रमाने घेतले जाते. त्याचप्रमाणे नासाकाचे माजी संचालक सुरेशराव सहाणे यांच्याही नावाची खासगीत चर्चा आहे. मनसेकडून भीमा मालुंजकर व खंडेराव धांडे यांचे नाव अग्रस्थानी आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून रतन पा. जाधव यांना उमेदवारीसाठी पुढे केले जात आहे.
शिरसाठे गटातून कॉँग्रेसकडून कृउबा संचालक अ‍ॅड. अरुण पोरजे, माजी संचालक निवृत्ती खातळे यांचे नाव मागेपुढे घेतले आहे, तर गोरख बोडके व डॉ. दिलीप खातळे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी हायकमांडपर्यंत फिल्डिंग लावली आहे. हा गट मनसेने प्रतिष्ठेचा केला असून, आज तरी अ‍ॅड. रतनकुमार ईचम यांचा बोलबाला या गटात आहे. शिवसेनेकडून रमेश धांडे या विभागप्रमुखाला उमेदवारी मिळावी, असा सैनिकांचा सूर आहे.
घोटी गटातून महिला राखीव प्रवर्गासाठी जागा असूनही या गटासाठी मजूर फेडरेशनचे संचालक उत्तम मांडे यांच्या पत्नी सौ. सरिता मांडे, कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रामनाथ शिंदे यांच्या पत्नी सौ. विठाबाई शिंदे, सौ. अलका सुनील जाधव हे स्पर्धेत आहे, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून माजी जि.प. सदस्य उदय जाधव यांच्या पत्नी सौ. अलका जाधव यांचे नाव जवळजवळ निश्चित मानले जात आहे. मनसेकडून आजतरी पं.स. सदस्य संतोष दगडे यांच्या पत्नी ग्रा.पं. सदस्या सौ. गोदावरी दगडे यांचे नाव पुढे आहे.
शिवसेनेकडून शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव यांच्या सौभाग्यवती सौ. अंजनाताई जाधव यांचे नाव आघाडीवर आहे. ऐनवेळी शिवसेनेकडून आगरी समाजाला प्रतिनिधित्वाची संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या गटात निर्णायक समजला जाणारा आगरी समाज काय निर्णय घेतो यावरही बरेच राजकीय गणित अवलंबून आहे.
खेडभैरव हा गट प्रतिष्ठेचा मानला जात असल्याने या गटांत कॉँग्रेसकडून आमदार माणिकराव कोकाटे यांच्यावर कॉँग्रेस उमेदवाराची भिस्त आहे. यावेळी कोकाटेंमुळे गटात कॉँग्रेसला हमखास यश मिळेल, अशी आशा असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संपतराव काळे यांच्या पत्नी अलका काळे याचे नाव आघाडीवर मानले जाते, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून मोठी चुरस आहे. विद्यमान सदस्य बाळासाहेब गाढवे हे आपल्या पत्नीच्या उमेदवारीसाठी तर युवा नेते सुनील वाजे हेही आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नात आहे. भाजपसाठी माजी तालुकाध्यक्ष नंदू गाढवे व तालुकाप्रमुख खंडेराव झनकर हेही आपल्या पत्नीसाठी प्रयत्नशील आहे.
शिरसाठे गट हाही महिला सर्वसाधारण राखीव असल्याने विद्यमान जि.प. सदस्य जनार्दनमामा माळी हे आपल्या पत्नीला कॉँग्रेसकडून उमेदवारी आणतील, असा सूर आहे, तर कॉँग्रेसला शह देण्यासाठी शिवसेनेनेही कंबर कसली असून, उमेदवार कोण? याबाबत मात्र उत्कंठा लागून राहिली आहे. मनसे व राष्ट्रवादी कॉँग्रेस हे उमेदवारीसाठी कोणाच्या गळी पडतात हे अद्यापही स्पष्ट नाही.
तालुक्यातील प्रत्येक नेत्यांनी गटांसाठी लक्ष केंद्रित केल्याने पंचायत समितीसाठी गणातून उमेदवारी लढविण्याबाबत उमेदवार शोधासाठी राजकीय पक्षांची गणगण होत आहे असे असून, पांडुरंग शिंदे, संपतराव काळे, खंडेराव भोर, रघुनाथ तोकडे, गोपाळा लहांगे, बाळासाहेब शिंदे, विष्णू चव्हाण, देवराम मराडे, पांडुरंग वारुंगसे, रमेश जाधव हे स्वत: तर प्रा. मनोहर घोडे, माजी सभापती रामदास घारे, आनंदराव सहाणे हे आपल्या पत्नीसाठी पंचायत समितीसाठी
उमेदवारी मिळविण्यासाठी पुढाकार घेत आहे. बहुतांश ठिकाणी गणांसाठी सक्षम उमेदवार मिळत नसल्याने राजकीय पक्षांची गणगण झाली आहे.
दरम्यान, प्रतिष्ठेची व चुरशीच्या निवडणुका होणार असल्याने सर्वच इच्छुक उमेदवारीसाठी राजकीय नेत्यांची हाजी-हाजी करीत आहेत, तर राजकीय पक्ष मात्र, सक्षम उमेदवार निवडीच्या शोधात आहेत. इगतपुरी तालुक्यातील उमेदवार निश्चितीसाठी पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार समीर भुजबळ, आमदार सौ. निर्मला गावित, आमदार माणिकराव कोकाटे, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील बागुल, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, मनसेसाठी आमदार वसंत गिते, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.