आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेतीन टन गुटखा दाहिनीत; महिन्याला येतो 15 लाखांचा गुटखा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- बंदी असतानाही गुटख्याची विक्री करणार्‍या व्यावसायिकांकडून अन्न-औषध प्रशासनाने जप्त केलेला सुमारे 41 लाख रुपयांचा साडेतीन टन गुटखा शुक्रवारी दाहिनीत जाळून नष्ट करण्यात आला. कारवाई सुरू असूनही शहरात दरमहा सुमारे 10 ते 15 लाखांचा गुटखा येत असल्याची माहितीही समोर आली आहे.

राज्य शासनाने अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत राज्यात गुटखाबंदी केली आहे. तरीसुद्धा शहरात सर्वत्र गुटख्याची विक्री सुरू असल्याचे प्रशासनाच्या कारवाईत उघड झाले आहे. नाशिक कार्यालयाने 20 जुलै ते 31 डिसेंबर या कालावधीत बेकायदेशीर विक्री करणार्‍या व्यावसायिकांकडून साडेतीन टन (23 लाख 90 हजार 831 पाऊच) असा एकूण 41 लाख 38 हजार 312 रुपयांचा गुटखा जप्त केलेला आहे. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास हा माल जाळून नष्ट करण्यात आला.

सहआयुक्त चं. भा. पवार, सहाय्यक आयुक्त रा. फ. कोळी, सु. श. क्षीरसागर, वि. प. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जुन्या नाशकातील एक घाऊक व्यापारी शहरात गुटखा आणून त्याची पद्धतशीरपणे सर्व भागात विक्री करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. विशेष म्हणजे, हा गुटखा ‘नेहमीच्या’ ग्राहकांना सहज मिळत आहे. मात्र, त्यासाठी ‘कोडवर्ड’चा अवलंब होत आहे. ‘आपला माल’, ‘नंबर 1’, ‘भाऊ’ अशा शब्दप्रयोगांसह हात उंचावण्याच्या इशार्‍यातूनही देणार्‍या-घेणार्‍यांमध्ये त्याचे व्यवहार सुरू असल्याचे माहीतगार मंडळी सांगतात.