आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरप्रकार उघड: 65 कोटींच्या मशिनरींचा कचरा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- कर्मचारी नसताना खतप्रकल्पासाठी खरेदी करण्यात आलेल्या 65 कोटींच्या मशिनरींसह प्रकल्पावर चालणार्‍या गैरप्रकारांची पाहणी स्थायी समितीचे सभापती रमेश धोंगडे यांनी केली. बहुतांश मशिनरी बंद अवस्थेत आढळून आली, तर त्यातील अनेक वाहनांचे पार्टस् चोरीला जाऊनही त्याची प्रशासनाला पुसटशी कल्पनाही नसल्याची बाब या पाहणी दौर्‍यावेळी निदर्शनास आली.

सभापती धोंगडे यांच्यासह सिडको प्रभाग समितीचे सभापती अरविंद शेळके, नगरसेवक सुदाम कोंबडे, अनिल मटाले यांनी अचानक खत प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. वाहनांचा वापर बंद असल्याचे कारण विचारले असता याबाबतचे उत्तर आमचे वरिष्ठच देतील, असे घनकचरा तज्ज्ञ संजय बोरसे आणि कनिष्ठ अभियंता सुनील खैरनार यांनी दिले. प्रकल्पावर एकही अधिकारी उपस्थित नसल्याचे आढळून आले. सभापती आल्याची माहिती मिळताच उपअभियंता डी. एम. जाधव आले. अनेक वाहने प्रकल्पावरच कचर्‍यात धूळखात उभे असल्याचे दिसून आले. एकीकडे बांधकाम आणि आरोग्य विभागासाठी वाहने नसल्याचे अधिकारी सांगतात, तर दुसरीकडे कोट्यवधी रुपयांची वाहने कचर्‍यात पडलेली आढळल्याने या खरेदीची चौकशी करण्याबरोबरच याप्रकरणाचे विशेष लेखापरीक्षण करण्याचे आदेश देणार असल्याचे या वेळी सभापती धोंगडे यांनी सांगितले.

ही वाहने आढळली बंद
खतप्रकल्पावर तीन वर्षांपूर्वी खरेदी केलेले जेसीबी, ट्रॅक्टर्स, लोडर, पोकलॅँड यासह अनेक वाहने बंद अवस्थेत आढळून आली. खरेदी झाल्यानंतर एकदाही या मशिन्स व वाहनांचा उपयोग न झाल्याने सर्वच वाहनांना गंज लागून अनेक पार्टसही चोरीस गेल्याचे समोर आले. वाहन क्रमांक : एमएच 15 बी डब्ल्यू 3938, एमएच 15 बी डब्ल्यू 448, एमएच 15 बी डब्ल्यू 3544, एमएच 15 बी डब्ल्यू 3542, एमएच 15 बी डब्ल्यू 788, एमएच 15 बी डब्ल्यू 3985, एमएच 15 बी डब्ल्यू 3543, एमएच 15 बी डब्ल्यू 956, एमएच 15 बी डब्ल्यू 446, एम एच 15 एबी- 4204, एम एच 15 एबी 4205, एम एच 15 एबी 4206.

हजेरी पुस्तकातही चालूपणा : येथील हजेरी पुस्तक मागविले असता के. एच. जाधव हा कर्मचारी 10 जून रोजी अनुपस्थित असूनही त्यापुढे कोणताही शेरा लिहिलेला आढळला नाही. त्याबाबत येथील कर्मचार्‍याला काहीही सांगता आले नाही. अजिंक्य चुंबळे यांनी ही बाब सभापतींच्या लक्षात आणून दिली.

सीसीटिव्ही कॅमेरा बसविणार
खतप्रकल्पावर होणार्‍या गैरप्रकारांना आळा बसविण्यासाठी त्याठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीच्या सभेवर मांडण्यात येणार असल्याची माहिती धोंगडे यांनी दिली. घंटागाड्यांचे वजन करताना चालक आणि कर्मचारी वाहनाच्या खाली उतरत नसल्याची तक्रार सभापतींकडे आली होती. यामुळेच ही उपाययोजना केली जाणार आहे. तसेच फाळके स्मारक येथेही कॅमेरे बसविले जाणार आहे.