आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिन्नर सेतू कार्यालयातील कर्मचार्‍यांवर दामदुप्पट वसुलीचा आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर: येथील तहसील कार्यालयअंतर्गत असलेले सेतू कार्यालयाचे कर्मचारी गर्दीचा चांगलाच फायदा उचलत आहेत. पावती अपूर्णांकात असली तरी पैसे मात्र पूर्णांकात घेऊन सेतूचे कर्मचारी उखळ पांढरे करून घेत आहेत. परंतु, असा काही प्रकार येथे चालत नसल्याचे ठामपणे सांगत सेतूचालक कर्मचार्‍यांना पाठीशी घालत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 20 रुपये सेवा शुल्क आणि 2 रुपये 47 पैसे सेवा कर अशी 22 रुपये 47 पैशांची पावती देऊन नागरिकांकडून मात्र त्याच्या दुप्पट पैसे उकळले जात असून, तहसीलदारांकडे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सेतूच्या कार्यालयाकडून नव्याने एसएमएस सुविधा सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून प्रकरण नेमके कुठल्या ‘पायरी’वर आहे, याचे आकलन नागरिकांना होणार आहे. त्यासाठी पाच रुपयेप्रमाणे प्रति प्रकरणानुसार आकारणी केली जाते; मात्र त्याचा पावतीत उल्लेख न करताच येथील सेतू केंद्राकडून पूर्ण रक्कम टाकली जाते. त्यामुळे ग्राहक या सुविधेपासून पैसे देऊनही वंचित राहतात. सध्या बारावीचा निकाल लागल्याने सेतूत विविध दाखले मिळवण्यासाठी विद्यार्थी व त्यांच्या पालकांची झुंबड उडत आहे. आठवडाभरात दहावीचाही निकाल जाहीर होण्याची शक्यता असून, त्यानंतर दाखले काढणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये आणखी भर पडणार आहे. तत्पूर्वीच तहसीलने या वसुलीला अटकाव घालणे गरजेचे आहे.
सुटे पैसे नाही तर मग घ्या चॉकलेटचा प्रसाद
22 रुपये 47 पैसे रक्कम असलेली पावती दिल्यानंतर उर्वरित पैसे सुटे नसल्याच्या कारणास्तव नागरिकांना बळजबरी चॉकलेट देऊन हिशोब पूर्ण केला जातो. एखादे चॉकलेट दिले तर हरकत नाही; मात्र बर्‍याचदा चार ते पाच चॉकलेट नागरिकांच्या इच्छेविरुध्द माथी मारले जातात. चॉकलेट नाकारणार्‍यांना सेतू कर्मचार्‍याकडून अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागते, तर वृद्धांना मनस्ताप सहन करावा लागतो.
अर्ज तपासण्यासाठी ही मोजावे लागतात पैसे
दाखले मिळण्यासाठी दस्त जमा करताना नागरिकांना वारंवार चकरा माराव्या लागू नये, त्यात काही त्रुटी राहता कामा नये, यासाठी सेतूच्या कर्मचार्‍यांनी ते जमा करताना तपासून घेणे गरजेचे आहे. सुरुवातीलाच ते व्यवस्थित तपासले तर त्यात असलेले दोष दूर करून दाखले मिळणे सोपे होते. हा शुद्ध हेतू तपासणीचा असतो तरी त्यालाही कर्मचार्‍यांनी खोडा घातला आहे. अर्ज तपासणीसाठी आलेल्या नागरिकांकडून पैसे उकळले जात असल्याचा प्रकार बिनदिक्कत सुरू आहे.