आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखोंचा अवैध मद्यसाठा जप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरात अवैध मद्य विक्रीचे प्रमाण वाढत असल्याच्या तक्रारी येत असताना मुंबईमधील भरारी पथकाने आरटीओनजीक पाच लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा पकडला. यामुळे स्थानिक उत्पादन शुल्क विभागाला चांगलाच दणका बसला असून, त्यांच्या तत्परतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सध्या महात्मा गांधी जयंतीनिमित्त सप्ताह सुरू असून, मंगळवारी त्याअंतर्गत ‘ड्राय डे’ घोषित करण्यात आला होता. ड्राय डेला वाइन शॉप तसेच परमिट रूम बंद असल्यामुळे मद्यपींचा ओढा महामार्गलगतच्या ढाब्यांकडे असतो. पंचवटी, अशोक स्तंभावरील मल्हारखाण, त्र्यंबक विद्यामंदिर, सातपूर, शिंदे, पळसे आदी ठिकाणीही छुपी मद्य विक्री होत असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी होत्या.

‘ड्राय डे’ च्या पूर्वसंध्येला मोठय़ा प्रमाणात अवैध मद्याची वाहतूक होत असल्याची बातमी मुंबई उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार पेठरोडवरील आरटीओ कॉर्नरनजीक सोमवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास एक बोलेरो(एमएच 04 डीएन 1325) अडवून तपासणी केली असता त्यात देशी-विदेशी मद्याचे 56 खोके आढळले. या प्रकरणी मुख्य संशयित प्रकाश खेमाणी याच्यासह गोपाळ नागरे, सुरेश लिलके यांना अटक करण्यात आली आहे. उत्पादन शुल्कचे अंमलबजावणी व दक्षता विभागाचे अधीक्षक प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुभाष जाधव व दुय्यम निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

स्थानिक यंत्रणेवर संशयाचे धुके
नाशिक शहर व जिल्ह्यात सर्रास अवैध मद्य विक्री सुरू आहे. गणेशोत्सव, नवरात्र या धार्मिक महोत्सवातही भल्या पहाटेच मद्याची दुकाने उघडली जात असतानाही त्यावर स्थानिक विभागाकडून कारवाई होत नसल्याचेही चित्र आहे. त्यामुळेच गेल्या सहा महिन्यांत याच मुंबईच्या भरारी पथकाकडून मालेगाव व देवळा तालुक्यात बनावट मद्याचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला होता. त्यापाठोपाठ शहरातदेखील याच पथकाने कारवाई केल्याने नाशिक पथकाच्या अधिकारी-कर्मचार्‍यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.