आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही वाट तीर्थाची, अवैध मद्याची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी श्रावणानिमित्त देशभरातून भाविक येतात. गोदावरीचे पवित्र तीर्थ घेण्यासाठीही रांगा लागत आहेत. दुसरीकडे, या भाविकांच्या श्रेद्धेचे श्राद्ध घालत या तीर्थक्षेत्र मार्गावरील कित्येक गावांमध्ये खुलेआम अवैध मद्यविक्री सुरू आहे. या प्रकारामुळे हा मार्ग ‘मद्यक्षेत्र’ म्हणून ओळखला जाईल की काय, अशी भयशंका भाविक आणि रहिवाशांना त्रासू लागली आहे.

या मार्गावरील हॉटेल संस्कृतीपर्यंतची हद्द पोलिस आयुक्तालयाची असून, पुढे त्र्यंबकेश्वर पोलिसांची हद्द सुरू होते. मार्गावरील त्र्यंबक विद्यामंदिरापासून ते त्र्यंबकेश्वर रस्त्यातील बेळगाव ढगा, अंजनेरी, तळेगाव, आदिवासीबहुल वस्ती, खंबाळे, महिरावणी, पैन्हे फाटा, पेगलवाडी, तळवाडे नजीकच्या काही हॉटेल्स, रस्त्यावरील हातगाड्यांवर वडापाव, मिसळ व भत्ता विक्रेत्यांकडूनही विनापरवानगी मद्य विक्री केली जाते.

महाविद्यालयांजवळच उघड विक्री
त्र्यंबकेश्वर रस्त्यावर विविध मठ, मंदिरांची परंपरा लाभलेली आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर आंतरराष्ट्रीय शाळा, आभियांत्रिकी महाविद्यालये, पर्यटकांसाठी खास आकर्षण म्हणून अनेक हॉटेल्स आणि रिसॉर्टस् उभारण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यासह देशभरातील विविध शहरांतून विद्यार्थी व पर्यटक येथे येत असतात. विशेष म्हणजे, या रस्त्यावरील काही महाविद्यालयांच्या प्रवेशद्वार, तसेच वसतिगृहांपासून हाकेच्या अंतरावरच हातगाड्या, हॉटेल्स व टपर्‍यांवरदेखील अवैध देशी-विदेशी मद्य विक्री होते आहे. या प्रकारांमुळे विद्यार्थ्यांमधील व्यसनाधीनता वाढू लागली आहे.

पोलिस-उत्पादन शुल्क विभागाचा काणाडोळा
पोलिस आयुक्तालयाच्या सातपूर हद्दीतील त्र्यंबक विद्यामंदिरापासून शंभर ते दोनशे मीटर अंतरावर अशप्रकारे अवैध मद्यविक्री असो की त्र्यंबकेश्वर मार्गावरील विविध खेडी, वाड्या, पाडे आणि फाट्यांवरही अवैध मद्यविक्रीची पाळेमुळे पसरलेली आहेत. अशा सर्वच अवैध व्यवसायांकडे पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाची डोळेझाक होते आहे. या अधिकार्‍यांच्या ‘मेहेरबानी’वरच हे व्यवसाय सुरू असल्याचे सांगण्यात येते. नियमित ‘अर्थपूर्ण’ तडजोडींमुळे या व्यवसायांना अभय मिळत आहे.

नाशिकरोड-सिन्नर पोलिसांची भूमिका संशयास्पद
नांदूरनाका परिसरासह नाशिकरोड पोलिसांच्या हद्दीत आणि महामार्गालगतच्या शिंदे व पळसे भागात हातागाड्यांवर आणि काही हॉटेल्समध्ये सर्रास देशी-विदेशी मद्य विकले जाते. येथूनच खोक्यात भरून आणलेला मद्यसाठा पुढे सिन्नर तालुक्यातील वडगाव-पिंगळा व आसपासच्या इतर गावांतही पडक्या घरात नेला जातो. तिथे प्लास्टिकच्या पिशवीत पाणी, मद्य आणि इतर पदार्थ मिसळून 20 रुपयांत फुगा विकला जातो. सकाळी आठ ते रात्री 8 असा चोवीस तास हा प्रकार सुरू असतो.

नाशिक कारखान्यापासून दोन किलोमीटर अंतरावर हा प्रकार नियमित आढळतो. परिसरातील कारखान्यामागील काही पडक्या घरांतही असा धंदा सुरू असल्याचे स्थानिक सांगतात. यासंदर्भात, पोलिस अधीक्षक आणि उत्पादनशुल्क विभागाकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे.