आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनातपासणी सर्रास पाणीविक्री, प्रशासनाकडून कारवाईत दिरंगाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळ्यात पाणी बाटल्या, तसेच जारची विक्री जाेरदार सुरू असताना, या मागणीचा गैरफायदा संबंधित व्यावसायिकांकडून घेतला जात आहे. सीलबंद पाणी विक्रीसाठी परवान्याची गरज असताना शहरात बिनदिक्कतपणे परवान्याशिवाय पाण्याच्या ट्रान्सपरंट जारची विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे, अन्न आैषध प्रशासनही अशा विक्रेत्यांवर कारवाई करीत नसल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत आढळून आले. या गैरमार्गाने हाेणार्‍या पाणीविक्रीमुळे नागरिकांचे आराेग्य धाेक्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही...

सीलबंद पाण्याच्या विक्रीसाठी आयएसआय ट्रेडमार्क, तसेच व्यवसायिकास अन्न औषध प्रशासनाचा परवाना घ्यावा लागतो. पाणी शुद्धतेच्या निकषांची पूर्तता केल्याशिवाय प्लांट सुरू करता येत नाही. नियम निकषांची पूर्तता करणारे शहरात १३ व्यावसायिक आहेत. या प्लांटमध्ये बाटलीबंद, पाकीटबंद पाण्यासह कॅनद्वारेही पाण्याची विक्री केली जाते. प्रत्यक्षात शहरात जेवढी पाणीविक्री केली जाते, त्याच्या दुप्पट-तिपटीपेक्षा जास्त पाणी परवाना नसलेल्या कंपन्यांचे पाणी विकले जात आहे. हे पाणी सीलबंद करता उघडपणे कॅनमधून विकले जाते. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे समोर आले आहे.

खुल्या पद्धतीने पाण्याची विक्री करणारे व्यावसायिक शॉपअ‍ॅक्ट परवाना आणि जिल्हा आराेग्य प्रयोगशाळेतून पाणी पिण्यासाठी योग्य आहे, याचे प्रमाणपत्र स्वत:कडे घेऊन व्यवसाय करीत आहेत. पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत घेऊन गेल्यावर अधिकारी त्या पाण्याची तपासणी करून प्रमाणपत्र देतात. तपासणीसाठी सादर करण्यात आलेले पाणी कुठले आहे. नंतर त्याच दर्जाचे पाणी विकले जाईल किंवा नाही, याची कुठल्याही प्रकारची चाैकशी केली जात नसल्याचे वास्तव आहे. अशाप्रकारे पाणी विक्री करणार्‍या कंपन्यांवर अन्न औषध प्रशासन विभागाचे नियंत्रण असणे अत्यंत अत्यावश्यक आहे. अन्यथा अशा पाण्याने नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आल्यास त्याची जबाबदारी काेण घेणार, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित हाेत आहे.

मध्यमवर्गीयांपासून श्रीमंतही...
शहरातनेहमीच होणारा दूषित पाणीपुरवठा यामुळे ट्रान्स्परंट जारद्वारे विकल्या जाणार्‍या पाण्याचा वापर वाढला आहे. यामुळे व्यापारी, उद्याेजक, बंगलाधारक तसेच लग्नसराईत कॅनमधील पाण्याचा सर्रास वापर होत आहे. उन्हाळ्यात पाण्याचा वापर जास्त असला तरी या पाण्याचा वापर बाराही महिने केला जात आहे.

‘अन्न आैषध’च्या कारवाईत २९ जार जप्त
अन्न आैषध प्रशासनाच्या वतीने नाशिकरोड परिसरातील शिखरेवाडी येथील एका विनापरवाना बीएसआय प्रमाणपत्र नसलेल्या पाणी विक्रेत्याच्या प्लांटवर कारवाई करण्यात येऊन २९ ट्रान्सपरंट जार जप्त करण्यात आले. अन्न-सुरक्षा निरीक्षक विवेक पाटील आणि अमित रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कारवाईत हे छापे टाकण्यात आले.

बाटली बंद पाण्याची प्रक्रिया हाेते अशी...
विविधप्रकारचे तसेच, नावांचे पाण्याचे ट्रान्सपरंट जार शहरातील बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध आहेत. साहजिकच त्यांच्या किंमतीही वेगवेगळ्या असतात. या पाण्याच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया कशी असावी, याची कार्यपद्धतीदेखील ब्युरो आॅफ इंडिया स्टँडर्डच्या वतीने ठरवून देण्यात आलेली आहे. त्यात पाणी हे जलसाठ्यातून (म्हणजे मुख्यत: विंधनविहिरींमधून) उपसल्यावर सर्वप्रथम गाळले जाते. त्यासाठी वाळूच्या कार्बनच्या गाळ्यांचा वापर केला जात असतो. त्यानंतर पाण्याच्या शुद्धीकरणाची तसेच, संपूर्ण निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया केली जाते. तसेच ओझोनेशनची प्रक्रियादेखील करण्यात येते. या प्रक्रियेनंतर निर्जंतुक अशा बाटल्या िकंवा पाउचच्या संवेष्टनांमध्ये पाणी पॅक केले जाते. अशाप्रकारे ब्युरो आॅफ इंडिया स्टँडर्डच्या वतीने ठरवून िदलेल्या पद्धतीनुसार बाटलीबंद पाण्याची प्रक्रिया ठरवून देण्यात आलेली आहे.

परवाना धारकांना फटका...
सीलबंद पाणी विक्रीची कंपनी उभारणीसाठी दीड ते दोन लाख खर्च येतो. भारतीय मानक ब्युरोची मंजुरी तसेच अहमदाबाद येथील गुजरात टेस्ट हाऊस किंवा पुणे येथील टेस्ट हाऊसमधून सर्व प्लांटची तपासणी हाेते. आयएसआयच्या नियमानुसार मशिनरींची उभारणी हाेते. नियमानुसार काम करणार्‍या कंपन्यांचे उत्पादन बाेगस कंपन्यांपेक्षा कमी असते हे विशेष. खुल्या पद्धतीने पाण्याची विक्री करणार्‍या प्लांट मालकांकडे कसल्याही प्रकारचा परवाना नसतो. परंतु, त्यांची पाणीविक्री ही परवानाधारक कंपन्यापेक्षाही अधिक आहे. त्यामुळे भांडवल कमी आणि उत्पन्न जास्त, अशी त्यांची अवस्था आहे. परवानाधारक व्यावसायिकांची चिंता वाढत असून, त्यांना प्रशासनाकडून अपेक्षा आहेत.

शंभरहून अधिक प्लांट‌्स
खुल्या पद्धतीने थंड पाण्याची विक्री करणारे सुमारे शंभरहून अधिक व्यावसायिक आहेत. त्यानुसार, या सर्व व्यावसायिकांनी जिल्हा आराेग्य प्रयोगशाळेतून कंपनीतील पाणी पिण्यासाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. मात्र, जानेवारी ते एप्रिलपर्यंत फक्त पाच ते सहा व्यावसायिकांनीच प्रमाणपत्र घेतले आहे. जानेवारीपूर्वी चार ते पाच व्यावसायिकांनीच प्रमाणपत्र घेतलेले आहे.

थेट प्रश्न : आर. एस. कोहली, अन्नसुरक्षा अधिकारी, अन्न आैषध प्रशासन
- शहरात अनेक ठिकाणी विनापरवाना ट्रान्सपरंट जारची विक्री केली जात आहे, याबाबत माहिती आहे का?
शहरात२० ते २५ प्लांट्सला परवानगी देण्यात आलेली आहे, तर विनापरवाना पाण्याच्या प्लांटवर प्रशासनाच्या वतीने छापा टाकण्याची मोहीम सुरू आहे.
- आतापर्यंतकिती प्लांटचे परवानगीसाठी अर्ज आले आहेत?
आतापर्यंतपाण्याच्या जारसाठी किती अर्ज आले आहेत, याची माहिती घेऊन संबंधित प्लांटची पाहणी करणार आहे.
- शंभरहून अधिक विनापरवाना प्लांट शहरात सुरू आहेत, त्यांच्यामुळे परवानाधारकांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे, त्याचे काय?
- विनापरवाना सीलबंद पाण्याचे जार विक्री करणार्‍या प्लांटवर कारवाई करण्यासाठी लवकरच विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

अशी आहे आकडेवारी...
45 रुपये एका कॅनची किंमत आहे.
20 लिटर पाणी एका कॅनमध्ये असते.
200 कॅन एक कंपनी दररोज विकते.
3.40 लाख रुपयांची दररोज उलाढाल.
52 कंपन्यांद्वारे शहरात खुल्या पद्धतीने पाणीविक्री होते.
1.60 लाख लिटर पाण्याची आठ हजार कॅनमधून विक्री.
बातम्या आणखी आहेत...