आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षाचालकांच्या बेशिस्तीला पोलिस-आरटीओच जबाबदार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरातील रिक्षाचालकांची बेशिस्त आणि मग्रुरीला केवळ पोलिस व प्रादेशिक परिवहन विभागाचे बोटचेपे धोरणच कारणीभूत असल्याचा थेट आरोप शहरातील ग्राहक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे. मुंबई, पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्येही रिक्षा मीटरप्रमाणे चालाव्यात या मागणीबरोबरच रिक्षाचालकांना गणवेश, बिल्ला, योग्य वर्तनाची अंमलबजावणी करण्यात यंत्रणेला अपयश येत असल्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्धारही ग्राहक संघटनांनी ‘दिव्य मराठी’कडे प्रतिक्रियांतून व्यक्त केला.
शहर व परिसरातील बसस्थानके, बसथांबे, सार्वजनिक चौक, रुग्णालये, महाविद्यालयांसमोर भररस्त्यातच मुजोर रिक्षाचालकांनी अनधिकृत थांबे निर्माण केले आहेत. पोलिसांच्या डोळ्यांसमोर रिक्षा बेशिस्तपणे आडव्या-तिडव्या उभ्या केल्या जात असतानाही ते बघ्याची भूमिका घेताना दिसतात. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने ‘मग्रुर रिक्षाचालक-बेफिकीर पोलिस’ मालिका सुरू केली असून, रिक्षाचालकांची मुजोरी व हतबल पोलिसांबाबत ग्राहक संघटना व प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पोलिस व परिवहन विभाग रिक्षाचालकांविरुद्ध कारवाईचे धाडसच दाखवित नसल्याने वाहतुकीचा बट्टय़ाबोळ झाला आहे. रिक्षाचालकांकडून कायद्याचे सर्रास उल्लंघन केले जात असतानाही केवळ तडजोड शुल्क वसुलीतच पोलिस धन्यता मानत आहेत.
यंत्रणेची भूमिकाच संशयास्पद
शहरातील बहुतांश रिक्षाचालक गणवेश परिधान करत नाहीत. बिल्ला लावत नाहीत. त्यांचा पेहराव बघूनच बाहेरून येणारे प्रवासी घाबरतात. अव्वाच्या सव्वा पैसे आकारून हे रिक्षाचालक प्रवाशांची लुटमार करतात. रिक्षांच्या टपावर मीटरप्रमाणेच भाडे आकारणी केली जाईल, असे लिहिलेले असताना प्रत्यक्षात एकही रिक्षा मीटर टाकत नाही. याबाबत पोलिस, आरटीओकडे तक्रारी करूनही ते कारवाई करत नसल्याने त्यांच्या भूमिकेवरच संशय येतो आहे. चौकात, बसथांब्यावर रिक्षाचालक प्रवाशांशी उद्धट वागतात, महिला, मुलींशी उर्मट बोलतात. ज्येष्ठ नागरिकांची चेष्टा करतात. याविरोधात ग्राहक संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असून यंत्रणेच्या अधिकार्‍यांना भेटून कारवाईबाबत दबाव टाकण्यात येईल. अरुण भार्गव, ग्राहक संघटना
आरटीओ-आयुक्तांनी रिक्षातून फिरून दाखवावे
अखिल भारतीय ग्राहक पंचायत 2006 पासून रिक्षाचालकांच्या बेशिस्तीविरोधात आरटीओकडे तक्रारी करत आहे. परिवहन विभागाने तातडीने अंमलबजावणी केली असली तरी प्रत्यक्षात शहरात एकही रिक्षा नियमाने मीटरप्रमाणे भाडे आकारत नाही. याबाबत आरटीओकडे लेखी स्वरूपात तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही. मीटर न टाकता वाटेल तेवढे पैसे घेऊन ग्राहकांची पिळवणूक होते आहे. प्रशासनाला खरोखर शिस्त लावायची असेल तर पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल व आरटीओ जीवन बनसोड यांनी एक दिवस साध्या वेशात रिक्षातून प्रवास करावा. त्यांना यंत्रणेतील बेफिकीरी व सत्य उमगेल. मेजर पी.बी.भगत, अ.भा. ग्राहक पंचायत