आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसारामबापू ट्रस्टच्या अनधिकृत आश्रमाची तीन कोटींच्या जागेवर ‘कुटीर’ उद्योग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गोदावरी तीरावर आसारामबापू ट्रस्टने अनधिकृत उभारलेल्या आश्रमाची माहिती समोर येत नाही तोच गिरणारे हद्दीतही त्यांनी दीड एकरावर ‘नारायण कुटीर’ नावाचा बंगला असल्याचे पुढे आले आहे. बापू नाशिक मुक्कामी आले की ते याच बंगल्यास अधिक पसंती द्यायचे. विशेष म्हणजे हा बंगला उभारताना कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही, अशी माहिती पुढे येत आहे.


पोल्ट्री फार्म आणि फार्महाऊसची परवानगी असलेल्या जागी आश्रमाची उभारणी केलेल्या आसारामबापू आश्रम ट्रस्टचे आणखी एक बेकायदेशीर बांधकाम ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत दिसून आले. नाशिक तालुक्यातील गिरणारे गावाच्या हद्दीत गंगापूर धरणाच्या मागील बाजूस गट 281 मध्ये ट्रस्टने आश्रमाच्या नावे जमीन खरेदी करून त्या जागी मोठा दिमाखदार ‘नारायण कुटीर’ नावाने बंगला आहे. आसारामबापूचे चिरंजीव नारायणचे नाव या बंगल्याला देण्यात आले आहे. गिरणारेतील काही मोजकेच ग्रामस्थ आणि बंगला असलेल्या परिसरातील शेतक-यांव्यतिरिक्त तसेच आसारामबापू यांच्या काही निवडक भक्तांशिवाय या कुटीरची अन्य कुणालाच खबरबातही नाही. या बंगल्याविषयी एवढी गुप्तता पाळण्याचे कारण काय असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.


कारभा-यांनाच नाही ठाऊक
गिरणारेचे ग्रामसेवक बी. ए. राजगुरूयांनी या बंगल्याविषयी काहीच माहिती नसल्याचे सांगत अधिक माहिती देण्याबाबत कानावर हात ठेवले, तर सरपंच दौलत निंबेकर यांनी मी उद्या माहिती देतो, असे सांगून गट 281 वर आसारामबापू आश्रमाचा बंगला असल्याचे कबूल केले.


महसूल विभागाच्याच एका अधिका-याने मात्र बंगला बांधकामासाठी कोणत्याही प्रकारची परवानगीच घेतलेली नसल्याचे सांगितले.


कसा आहे बंगला
‘नारायण कुटीर’ बंगल्यासमोर मोठे प्रवेशद्वार,तारेचे कुंपण, प्रवेशद्वारापुढे सुरक्षा रक्षकासाठी खोली, बंगल्यापुढे लॉन्स आणि विविध वृक्ष तसेच छोटेखानी उद्यान दिसून आले. बंगल्यावर नारायण कुटीर आणि हरि ॐ असे लिहिलेले आहे.


बंगल्याची किंमत कोटींत
बंगला उभारण्यासाठी बापूंच्या एका अनुयायाकडूनच ही जमीन आठ-नऊ वर्षांपूर्वी अत्यल्प दराने म्हणजे केवळ सुमारे सात ते आठ लाखात खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे. आज याच परिसरात एकरी दोन कोटी रुपये जमिनीचे दर आहेत.


आश्रमातून जाणा-या रस्त्याची मोजणी
गोदावरी नदीकिना-यालगतच्या आश्रमातून जाणा-या डीपीरोडची चौरेषा मोजणी बुधवारी नगररचना विभागाच्या अभियंत्यांमार्फत करण्यात आली. फार्महाऊसच्या जागी आश्रमाचे बांधकाम केल्याप्रकरणी तसेच आश्रमातून जाणा-या डीपीरोडची जागा महापालिकेकडे हस्तांतरित न केल्याची बाब ‘दिव्य मराठी’ने मंगळवारी उघड केल्यानंतर महापौर अ‍ॅड. यतीन वाघ यांनी आश्रम पदाधिका-यांना संबंधित जागा तत्काळ महापालिकेस देण्याचे आदेश दिले होते. दोन दिवसांत जागा हस्तांतरित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. आश्रमातून जाऊन 24 मीटर डीपीरोडच्या चौरेषेची आखणी करून कर्मचा-यांनी त्याची मोजणी केली.