आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिकरोड- महाराष्ट्रातील दुष्काळाचा परिणाम पर्यटन व्यवसायावर होत आहे. पिण्याच्या पाण्याच्या गंभीर स्थितीमुळे उन्हाळ्याच्या सुटीत सहल, पर्यटन व देवदर्शनासाठी घराबाहेर पडणार्यांच्या भाविक व पर्यटकांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत 80 टक्के घट झाली आहे. यामुळे उलाढालीवरही परिणाम झाला आहे.
‘चारो धाम का एक धाम मुक्तिधाम’ अशी ओळख असलेल्या नाशिकरोड येथील मुक्तिधामला देशभरातून येणारे भाविक भेट देतात. हे भाविक दिवाळीच्या व उन्हाळी सुटीत येतात. यंदा ही संख्या 80 टक्क्यांनी घटली आहे. हंगामात मुक्तिधामच्या भक्त निवासात वेटिंग असायची. यंदा येथे सहज रूम उपलब्ध होत आहेत. मुक्तिधामला भेट देणार्या भाविकांत गुजरात व महाराष्ट्रातील भाविकांची संख्या मोठी असते. दरवर्षी येथे भेट देणार्या भाविकांच्या संख्येच्या तुलनेत यंदा लक्षणीय घट झाली असल्याचे दिसते.
गेल्या दोन वर्षांपासून ओडीसा, छत्तीसगड, दिल्ली व झारखंड येथेही मुक्तिधामचे आकर्षण निर्माण झाले आहे. यंदा या भागातून येणार्यांची संख्याही तुरळक आहे. मुक्तिधामबरोबर शिर्डी, वणी, सोमेश्वर, त्र्यंबकेश्वर, भंडारदरा, वैतरणा, सापुतारा, पांडवलेणी येथील पर्यटनस्थळावरदेखील अशीच स्थिती आहे.
नाशिकरोडच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम : भाविक व पर्यटकांची संख्या घटल्याने त्यांचा विपरीत परिणाम नाशिकरोडच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. खाद्यपदार्थ, खेळणी, मनुका, हॉटेल, लॉजिंग, ट्रॅव्हल्सच्या व्यवसायाची उलाढाल ठप्प झाली आहे. दुपारच्या वेळी आकाशात सूर्य आग ओकत असल्याने रस्त्यावर शुकशुकाट असल्याने सायंकाळपर्यंत बोहणीदेखील होत नसल्याने व्यावसायिक चिंताग्रस्त आहेत.
ट्रॅव्हल्स व्यवसायावर परिणाम
मुक्तिधाम येथून नाशिक दर्शनासाठी (पांडवलेणी, त्र्यंबकेश्वर, बालाजी मंदिर, सोमेश्वर, पंचवटी, काळाराम मंदिर, सीतागुंफा, तपोवन) 1500 ते 2500 रुपये, शिर्डीसाठी 2200 ते 2500 रुपये, वणी 1800 ते 2000 रुपये, वैतरणा, भंडारदरा 1800 ते 2000 रुपये, सापुतारा 2200 ते 2500 रुपये आकारले जात होते. भाविकांअभावी दर कमी केल्याचे ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी सांगितले.
गाड्यांना प्रवासी नाही
इंटरनेटवर काही धार्मिक स्थळांनी दुष्काळामुळे पाण्याच्या गंभीर प्रश्नची नोट टाकल्यामुळे भाविक व पर्यटक कमी झाल्याने ट्रॅव्हल्सच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. अविनाश भुले, संचालक, अनंता ट्रॅव्हल्स
मोजकेच भाविक
दिवाळी, उन्हाळ्याच्या सुटीत मुक्तिधामला दर्शन, बघण्यासाठी येणार्या भाविकांच्या गर्दीत घट झाली आहे. मुक्तिधाम परिसरातील भक्त निवासातील 120 पैकी गर्दीअभावी मोजकेचे रूम फुल्ल होत आहेत. राजाभाऊ कुलकर्णी , व्यवस्थापक, मुक्तिधाम
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.