आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळा माहात्म्य: दोन स्थळांवरील शाहीस्नानाचे वास्तव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशभरात चार कुंभमेळे भरत असले तरी त्यातील नाशिकचा कुंभमेळा हा सर्वार्थाने वेगळा असतो. देशभरातील अन्य तिन्ही कुंभमेळे हे महानगरांच्या बाहेरील भागात होतात. तर नाशिकचा कुंभमेळा हा महानगराच्या मध्यवर्ती भागात होतो. प्रयागचा कुंभमेळा हिवाळ्यात तर हरिद्वार आणि उज्जैनचा कुंभमेळा उन्हाळ्यात भरतो . केवळ नाशिक - त्र्यंबकचाच कुंभमेळा हा पावसाळ्यात भरताे. त्यामुळे त्यासाठीचे नियोजनदेखील अधिक गुंतागुंतीचे असते.

या चारच ठिकाणी का भरतो कुंभमेळा...
भारतात ज्या सर्वाधिक पुरातन - प्राचीन परंपरा अव्याहतपणे सुरू आहेत, त्यातील एक परंपरा म्हणजे कुंभमेळा होय. हिंदू पौराणिक आख्यायिकेनुसार समुद्रमंथनातून अमृतकुंभ बाहेर निघाला. दानवांच्या हातात तो कुंभ लागून ते अमर होऊ नयेत, म्हणून देव आणि दानवांमध्ये युद्ध झाले. इंद्रपुत्र जयंताने गरुडासह तो कुंभ आकाशमार्गे दूर नेला. त्यावेळी ज्या चार ठिकाणी हे अमृताचे थेंब पडले, त्या चार ठिकाणी कुंभमेळे भरतात. एक थेंब हरिद्वारमधील गंगा नदीत, दुसरा थेंब उज्जैन येथील क्षिप्रा नदीत, तिसरा थेंब नाशिकच्या गोदावरी नदीत आणि चौथा थेंब प्रयागच्या गंगा, यमुना सरस्वती नद्यांच्या संगमावर पडला होता. त्यामुळे ही चार स्थळे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असून, या चारच ठिकाणी कुंभमेळा भरतो.