आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांद्याची संभाव्य दरवाढ टाळण्यासाठी 7 व्यापाऱ्यांच्या 25 ठिकाणांवर छापे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांदवड- येथे रास्ता रोकोच्या प्रयत्नातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची समजूत काढताना बाजार समिती सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन आहेर, पोलिस निरीक्षक अनंत मोहिते आदी. - Divya Marathi
चांदवड- येथे रास्ता रोकोच्या प्रयत्नातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची समजूत काढताना बाजार समिती सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन आहेर, पोलिस निरीक्षक अनंत मोहिते आदी.
नाशिक- कमी दरात शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करून साठवून ठेवायचा आणि नंतर कृत्रिम टंचाई निर्माण करून दरवाढ मिळवत आर्थिक लाभ पदरी पाडून घ्यायचा व्यापाऱ्यांचा फंडा आहे. केंद्राच्या समितीने हे हेरूनच आठवड्यापूर्वीच जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांत पाहणी केली. सध्या बाजार समित्यांत कांदा १२ ते १५ रुपये किलोने विक्री होत असला, तरी किरकोळ बाजारात तो २० ते ३० रुपये किलो दराने विक्री होत आहे. 

दरवर्षी सणांचा हंगाम सुरू झाल्यानंतर दिवाळीच्या आसपास कांद्याचे भाव भडकतात. त्यामुळे भविष्यात कृत्रिम टंचाई होऊन कांदा दरवाढ होऊ नये म्हणून आयकर विभागाने गुरुवारी सकाळी सहापासूनच नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांवर छापे टाकले. या व्यापाऱ्यांच्या एकूण २५ ठिकाणांची तपासणी सुरू असून एकूण साठा, खरेदी, विक्री याची नोंद घेतली जात आहे. अनेक ठिकाणी लिलाव बंद झाल्याने गुरुवारी शेतकऱ्यांचे नुकसान झाले. दरम्यान, व्यापारी असोसिएशनने शुक्रवार आणि शनिवारी कांदा लिलाव बंद ठेवल्याचे जाहीर केले आहे. सरकारच्या धोरणाविरोधात चर्चा करण्यासाठी व्यापाऱ्यांची शनिवारी विंचूर येथे बैठक होणार आहे. 
 
पावसामुळे मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकमधील कांदा खराब झाल्याने नाशिकच्या उन्हाळ कांद्याला मागणी वाढली. त्यामुळे चारशे ते पाचशे रुपये क्विंटल दराने विक्री होणार्या कांद्याचे दर हजार ७०० रुपयांपर्यंत गेले. त्यामुळे मुंबई, दिल्ली या मोठ्या शहरांत कांदा ३५ ते ४० रुपये किलो दराने विक्री होवू लागला. त्यामुळे केंद्राने भविष्यात किरकोळ बाजारात दरवाढ भडकू नये म्हणून प्रत्येक राज्यातील कांद्याची साठवणूक तपासण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आठवड्यापूर्वीच लासलगाव, पिंपळगाव बाजार समितीत केंद्रीय समितीने पाहणी केली होती. 
 
लिलावबंद, शेतकऱ्यांची गोची 
लासलगाव- येथे दोन व्यापाऱ्यांवर छापे टाकण्यात आले. त्यानंतर येथील लिलाव बंद पडले. रतनलाल राका आणि कांतीलाल मांगीलाल सुराणा या दोन व्यापाऱ्यांच्या राहत्या घरी, कार्यालयात तसेच खळ्यावर छापे पडले. दरम्यान, तीन ते चार वर्षांनंतर कांद्याला चांगले भाव मिळाले असताना शासनाच्या या धोरणामुळे लिलाव बंद पडल्याने शेतकऱ्यांची गोची होत असल्याचा आरोप शेतकरी करत होते. छाप्यांमुळे आता दरवाढ कमी होण्याची भीती शेतकऱ्यांच्या मनात असून दिवसभर या छाप्यांची चर्चा रंगली होती. 

या व्यापाऱ्यांवर छापे 
सतीश लुंकड (एस. ताराचंद)(सटाणा), खंडू देवरे (उमराणे), प्रवीण हेडा (चांदवड), रतनलाल राका (लासलगाव), कांतीलाल सुराणा (लासलगाव), रामेश्वर अट्टल (येवला), सोहनलाल मोहनलाल भंडारी (पिंपळगाव) 
 
कांद्याची दरवाढ अशी (प्रतिक्विंटल) 
२७जुलै : ७०० ते ८०० रुपये 
आॅगस्ट : १४०० ते १५०० रुपये 
आॅगस्ट : २६०० ते २७०० रुपये 
 
चांदवड- रास्ता रोको 
छाप्यानंतरव्यापाऱ्यांनी लिलाव बंद केले. त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांकडून रास्ता रोको. दुपारनंतर पुन्हा लिलाव सुरू. लिलाव बेमुदत बंद राहणार असल्याचे घोषित करण्यात आले. 
 
पिंपळगाव बसवंत- दोन दिवस मार्केट बंद 
आयकरचेअधिकारी सायंकाळी उशिरापर्यत तळ ठोकून. व्यापाऱ्यांकडून दोन दिवस कांदा मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय. 
 
येवला - लिलाव बंदमुळे हाल 
लिलावदुपारनंतर सुरू. लिलाव बंद पडल्याने शेतकऱ्यांचे हाल. 
 
मनमाड - रास्ता रोकाे 
बाजारसमितीत कांद्याचे दर पडल्याने शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको. 
 
मालेगाव- शेतकऱ्यांचा संताप 
उमराणेत छाप्यानंतर लिलाव दुपारी नंतर सुरू. धास्तीने लिलाव बंद ठेवल्यामुळे शेतकरी संतप्त. 
 
नामपूर- शेतकऱ्यांचा ठिय्या 
छाप्यानंतरलिलाव बंद. गैरसोय झाल्यामुळे शेतकऱ्यांनी केले ठिय्या आंदोलन. 
 
सटाणा- लिलाव सुरळीत 
संध्याकाळपर्यंत तपासणी. मात्र, दिवसभरात लिलाव पार पडले. उर्वरित वाहनांचे लिलाव उद्या (दि. १५) होतील. 
 
लासलगाव - लिलाव बंद, शेतकऱ्यांची गोची 
दोनव्यापाऱ्यांवरील छाप्यांची दिवसभर चर्चा. लिलाव बंद. गोची झाल्याने शेतकऱ्यांत नाराजी. 
 
बातम्या आणखी आहेत...