आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In 80th Dicked Vijay Tendulkars Comment On Gay Relationship

‘मित्राची गोष्ट’द्वारे ऐंशीच्या दशकात समलिंगी संबंधावर भाष्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सध्या समलिंगी संबंधावर सुप्रीम कोर्टाने गुन्ह्याचा शिक्का लावलेल्या वातावरणात ऐंशीच्या दशकातील या संबंधांवर धाडसी भाष्य करणार्‍या विजय तेंडुलकर यांचे ‘मित्राची गोष्ट’ हे नाटक क्रांतिवीर कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाने कालिदास कलामंदिर येथे सुरू असलेल्या कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत सादर केले.
या नाटकातून तेंडुलकरांनी ऐंशीच्या दशकात नातेसंबंधांमधल्या बदलांची चाहूल अत्यंत धाडसाने मांडली होती. समकालाशी जुळणारा नाटकाचा आशय, हे या संहितेचे यश दिग्दर्शकाने बर्‍यापैकी उचलण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, अभिनयाला साजेशी देहबोली आणि रंगभूमीवरील वावर कलाकारांना अपेक्षेप्रमाणे करता आला नाही. नमाचा बिनधास्तपणा, तिच्या आकर्षणाच्या तर्‍हा, याउलट तिच्या मैत्रिणीची घालमेल आणि समाजाने घालून दिलेल्या भिन्नलिंगी नातेसंबंधाच्या पायंड्याची मोडू पाहत असलेली चौकट यातली सह्यता-असह्यता हा संघर्ष संहितेतून नेमकेपणाने मांडण्यात आला; मात्र प्रत्यक्ष सादरीकरणात तितकी गती नाटकाला साधता आलेली नाही.
या नाटकाचे नेपथ्य व दिग्दर्शन राहुल मनोहर यांचे होते, तर प्रकाशयोजना रवी रहाणे यांची होती. पार्श्वसंगीत सौरभ काळे यांचे, तर वेशभूषा सुप्रिया बर्वे यांची होती. रंगभूषा माणिक कानडे यांची होती. बापूची भूमिका सौरभ टोचे यांनी, तर नमाची भूमिका तन्मयी चव्हाणके यांनी निभावली. तसेच, प्रदीप बोडके, सौरभ काळे, वासंतिका वाळके, दीपक पाटील, ऋषिकेश फोके, हर्षल खैरनार या कलाकारांनीही भूमिका निभावल्या
.
कौतुकास्पद प्रयत्न
एका विशिष्ट परिघातच सखोलात न जाता हे नाटक घुटमळत असल्यासारखे वाटले. तरीदेखील काही प्रसंगांमध्ये नमाची भूमिका चांगली वठवली गेली. मात्र, असे प्रसंग वगळता नाटकाची गांभीर्यता गतिमानतेच्या बरोबरीने पकड घेऊ शकलेली नाही. तथापि, या नवकलाकारांचा हा प्रयत्न सध्या सुरू असलेल्या समलिंगी संबंधांवरील वादविवादाच्या पार्श्वभूमीवर कौतुकास्पद होता.