नाशिक - सणोत्सव आणि मोर्चा बंदोबस्तामुळे काही प्रमाणात ढेपाळलेल्या ‘खाकी’ला धडक कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिल्यानंतर बुधवारी (दि. २८) रात्री उशिरापर्यंत शहरातील गंगापूर, सरकारवाडा, मुंबई नाका या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. ४२ टवाळखोरांसह १२९ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
शहरात गेल्या काही दिवसांपासून टवाळखोर सक्रिय झाल्याचे पोलिस आयुक्तांच्या व्हाॅट्सअॅप नंबरवर तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी पोलिस अधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरून धडक कारवाईचे आदेश दिले होते. बुधवारी रात्री कॉलेजरोड, गंगापूररोड, पंडित कॉलनी, सीबीएस, नवीन बसस्थानक, घारपुरे घाट, मल्हारखाण, आसारामबापू पूल, जॉगिंग ट्रॅक अादी भागात नाकाबंदी आणि कोम्बिंग अॉपरेशन राबवले. गंगापूररोड, कॉलेजरोड, पंडित कॉलनी रस्त्यांवर नाकेबंदी करण्यात आली. भरधाव वेगाने वाहन चालवणे, कागदपत्र जवळ बाळगणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७४ वाहनांवर कारवाई करण्यात आली. १३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात अाला. सुमारे हजारांचा दंड वसूल करण्यात आला. कॉलेजरोड परिसरात ४२ टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली. मुंबई पोलिस अधिनियमान्वये केस दाखल करण्यात आल्या.
टवाळखोरांसह गुन्हेगारांवर जरब बसवण्याकरिता पोलिस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, आनंद वाघ, राजेंद्र कुटे यांच्यासह पोलिस कर्मचारी रात्री उशिरापर्यंत कारवाईमध्ये सहभागी होते.