आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Kumbhmela State Transport Make Only 4 Crores Profit

एसटीला सिंहस्थामध्ये मिळाले ५०० कोटींऐवजी अवघे 4 कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ५०० कोटी रुपये उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, गृहीत धरलेल्या संख्येच्या प्रमाणात पन्नास टक्केही भाविक सिंहस्थात आले नसल्याने एसटीला अपेक्षित उत्पन्न मिळू शकले नाही. तीन पर्वण्यांच्या उत्पन्नाची गोळाबेरीज केली, तर महामंडळाला केवळ कोटी ५८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाचा इंधनाचा खर्चदेखील वसूल होऊ शकलेला नाही.

जिल्हा प्रशासनाने पर्वणी काळात अडीच ते तीन कोटी भाविक येण्याचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार तीन हजार बसचे नियोजन करून तात्पुरत्या स्वरूपातील २१ वाहनतळ उभारले होते. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले होते. मात्र, एसटीचा अंदाज चुकल्याने ही गुंतवणूक वाया गेल्याचे बोलले जाते. पहिल्या पर्वणीत पोलिसांनी अतिरेकी बॅरिकेड्स् लावल्याने भाविकांमध्ये नकारात्मक संदेश गेल्यामुळे भाविकांनी सपशेल पाठ फिरवली होती. त्यामुळे पहिल्या पर्वणीच्या दिवशी आणून ठेवलेल्या ३००० पैकी केवळ ११०० बस धावल्या होत्या.

दरम्यान, पहिल्या पर्वणीतील बंदोबस्ताच्या अतिरेकाबाबत चोहोबाजूंनी टीका झाल्यावर दुसऱ्या तिसऱ्या पर्वणीसाठी बंदोबस्ताचे बॅरिकेडिंगचे फेरनियोजन झाले. त्यामुळे त्यानंतर वाहतूक काहीशी सुकर झाल्याने दुसऱ्या पर्वणीला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दुसरी पर्वणी वगळता महामंडळाला अपेक्षित प्रवासी मिळू शकले नाहीत. त्यामुळे नफा मिळवणे दूरच राहिले, झालेला खर्चदेखील काढणे महामंडळास कठीण झाले आहे.

कुंभमेळ्यासाठी एसटीने शंभर रुपयांचे पास छापले होते. या पासवर भाविकांना २४ तासांसाठी कितीही कोठेही प्रवास करता येणार होता. परंतु, वाहतुकीच्या निर्बंधांमुळे भाविकांना कुठेच जाता आले नाही. पर्यायाने पहिल्या शाहीस्नानासाठी लाखो पास छापलेले असताना फक्त तीन आकडी पासची विक्री झाली. प्रत्येक शाहीस्नानासाठी वेगळ्या रंगाचा तारीख छापलेला पास असल्याने त्याचा अन्य ठिकाणी उपयोग करणे शक्य नाही. त्यामुळे या पासची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. या पासमधूनदेखील उत्पन्न लांबच, त्याच्या छपाईचा खर्चही त्यातून निघू शकलेला नाही, असे एसटीच्या अधिकाऱ्याने खासगीत बोलताना सांगितले.