आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोंगरातील वाहून जाणारे पाणी अडवून दुष्काळावर मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाण्यामध्ये इतर तालुक्यांपेक्षा अधिक पाऊस पडतो. परंतु, हे पाणी डोंगरदऱ्यातून वाहून जाते. त्यामुळे या नागरिकांना केवळ भातपिकावरच समाधान मानावे लागते. जानेवारी ते मेपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. अशीच परिस्थिती सिन्नर तालुक्यातील धुळवड या गावासह परिसरातील गावांची आहे.
परिसरात मुसळधार पाऊस होतो, मात्र पाणी वाहून जात असल्याने या भागातील शेतकऱ्यांना कायम दुष्काळाशी सामना करावा लागतो. मात्र, शेतीतून जाणाऱ्या नाल्याचे पाणी अडविले, तर दुष्काळावर मात करू शकतो हे धुळवडच्या रमेश आव्हाड या युवकाने ओळखले. नाल्यावरच बंधारा बांधून पाणी अडविण्यास सुरुवात केली. त्यामुळे मे महिन्यातसुद्धा या बंधाऱ्यात पाणी असून गावकऱ्यांची तहानदेखील भागवितो. यासाठी त्याला कृषी अधीक्षक मधुकर पन्हाळे, उपविभागीय कृषी अधिकारी हेमंत काळे यांनी मदत केली.

सिन्नर तालुक्यातील धुळवड गावात रमेश आव्हाड यांचे सुमारे ५० एकर क्षेत्र आहे. सर्व जमीन डोंगरउताराला असल्याने पिकांना पाणी दिले, तर खाली वाहून जाते. पावसाळ्यात पडणारे पाणी वाहून जात असल्याने त्या ठिकाणी नालाबांध करण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनीही त्याला मदत केली. जेव्हापासून पाणी अडविले तेव्हापासून परिसरातील शेतीला त्याचा फायदा होत आहे. यावर्षी जून महिन्यात जिल्ह्यातील शेतकरी पावसासाठी देवाला साकडे घालत असताना रमेशने टोमॅटो, डाळिंब आणि कांद्यासारख्या पिकांचे उत्पादन घेतले. जिल्हा परिषदेचा कृषी विभागही दुसरा बंधारा बांधण्यासाठी मदत करीत आहे. सिन्नरमधील धुळवड येथील तरुण शेतकऱ्याने नालाबांध करून अशी केली दुष्काळावर मात.
शेतकऱ्यांनी हिंमत दाखविली पाहिजे
डोंगरदऱ्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी पाणी अडविले तर नक्कीच दुष्काळावर मात करता येणे शक्य आहे. मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांनी प्रथम कष्ट आणि पदरमोड करण्याची हिंमत दाखविली पाहिजे. रमेश आव्हाड, शेतकरी, धुळवड