आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संततधार पावसाचे थैमान: रस्त्यांचे झाले नाले अन् खड्ड्यांचे तलाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- संततधार पावसाने लागोपाठ दुस-या दिवशीही झोडपून काढल्याने शहरातील जनजीवन बुधवारी विस्कळीत झाले. संपूर्ण शहरात ठिकठिकाणी पाणी साचून लहान-मोठे ‘तलाव’च तयार झाले. एकीकडे, पाणीकपात आणि दुष्काळाचे सावट दूर करत मनात हर्ष निर्माण करणा-या या सरींनी अनेकांची चांगलीच त्रेधातिरपीटही उडविल्याचे चित्र दिसले. जवळपास दीड महिना तोंडही न दाखवणा-या पर्जन्यराजाने तीन दिवसांपासून शहरात तळच ठोकला. सकाळी साडेआठपासून ते सायंकाळी साडेपाचपर्यंत 64.8 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. पिण्याच्या पाण्याचे संकटही यामुळे ब-याचअंशी दूर झाले. गोदावरी, नासर्डीसह छोटे-मोठे नाले दुथडी भरून वाहू लागल्याने सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. रस्त्यांवर पाणी साचल्याने त्यात पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता. अनेक वाहनधारकांना वाहन ढकलतच इच्छित स्थळ गाठावे लागले. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवरही पावसाचा परिणाम झाला. विद्यार्थी वाहतूक करणा-या वाहनधारकांनाही कसरत करतच विद्यार्थ्यांची वर्दी पार पाडावी लागली.

नद्या दुथडी भरून, घरांमध्येही पाणी...
गोदावरी, नासर्डी, वालदेवीला पूर
बुधवारच्या आठवडे बाजारावर पाणी
नासर्डीच्या दुतर्फा घरांमध्ये पाणी
मुंबई नाक्यावर खड्ड्यांमध्ये वाहने फसल्याने वाहतूक कोंडी
पंचवटीत झोपडपट्ट्यांमध्ये शिरले पाणी
सिडकोतही अनेक घरांमध्ये पाणी
सातपूरला काही कंपन्यांच्या आवारात पाणी
कॉलेजरोड, गंगापूररोडही जलमय
मायको सर्कल, कुटे मार्गावर पाणीच पाणी
जुन्या नाशकात चिखलाचे साम्राज्य
अतिवृष्टीमुळे विजेचे 25 खांब कोसळले
राणेनगरसह सात रोहित्रांतून होणारा वीजपुरवठा बंद
नाशिक-पुणे महामार्गावर खड्डेच खड्डे
निम्म्या कर्मचा-यांवरच आपत्ती निवारणाचा बोजा
आधुनिक यंत्रसामुग्रीवर कोट्यवधी रुपये खर्च करणा-या अग्निशामक दलाकडे संभाव्य आपत्तीला तोेंड देण्यासाठी पुरेसे संख्याबळ नसल्याची बाब बुधवारी गोदावरीला पूर आल्यानंतर उघड झाली. बचाव कार्याचा भार अवघ्या 155 कर्मचा-यांना पेलावा लागला. 320 मंजूर पदांसह 50 रिक्त पदांचा अनुशेष अपूर्ण असल्यामुळे आपत्ती निवारणासाठी दलाचे हात दुबळे ठरण्याचीच शक्यता यामुळे दिसत आहे. मंगळवारी त्र्यंबकेश्वर व नाशिकमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे रात्री 11 वाजेपासून अग्निशामक दलाने बचाव कार्य सुरू केले. बुधवारी गोदाघाटानजिक भरणा-या आठवडे बाजारासाठी मंगळवारपासूनच मुक्काम ठोकलेल्या विक्रेत्यांना धोक्याचा इशारा देत सुरक्षितस्थळी हलवताना जवानांची धावपळ झाली. त्यानंतर नासर्डीला पूर आल्यामुळे महादेववाडी, तिडके कॉलनी, आयटीआय पुलाजवळील वाहतूकही जवानांनी बंद केली. आनंदवलीकडून जलालवाडीकडे जाणारा पूल पाण्याखाली गेल्यामुळे येथेही जवान तळ ठोकून होते.
दलात सध्या 155 जवान काम करतात. त्यातही विभागीय कार्यालय व मुख्यालयात आपत्कालीन कृती दलासाठी काही कर्मचारी राखीव असतात. कुंभमेळा, वाढती लोकसंख्या, शहराचा विस्तार लक्षात घेता 320 पदे भरणे गरजेचे आहे. तसा प्रस्तावही शासनाकडे पाठवण्यात आला; मात्र त्यास मंजुरी मिळालेली नाही. दुसरीकडे, सेवानिवृत्तीमुळे 50 पदे रिक्त असून ती भरण्यासाठीही प्रतिसाद मिळत नाही. बोट, लाईफ जॅकेट्सची कमतरता : सद्यस्थितीत महापालिकेकडे तीन बोटी असून त्या सातपूर, पंचवटी व मुख्यालयात आहेत. या रबरी बोटींचे आयुर्मान साधारण पाच वर्षे इतके सांगितले जाते. या बोटी घेऊन तीन वर्षे झाली आहेत. रबरी बोटींचे आयुर्मान कमी असल्याचे लक्षात घेऊन आता फायबरच्या दोन बोटी घेण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी प्रत्येकी साडेसहा लाखांपर्यंत खर्चं आहे. त्याशिवाय, केवळ 100 लाईफ जॅकेट अग्निशामक दलाकडे आहेत. पूर परिस्थिती व कुंभमेळा लक्षात घेता 100 लाईफ जॅकेटची नव्याने खरेदी होणार आहे.
वायरलेस सेटही कालबाह्य : दलाने 2002 मध्ये साधारण 16 वायरलेस सेट्स खरेदी केले. त्यातील बरेच नादुरुस्त होतात. संबंधित कंपनीने उत्पादन बंद केल्यामुळे सुट्या भागांची अडचण आहे.