आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवक वाढल्याने किरकाेळ बाजारात कांदा ३० रुपये किलाे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लाल कांद्याची जिल्ह्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये आवक वाढल्याने दरात दोनशे रुपयांनी घसरण झाली आहे. २८०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होणारा कांदा २४०० ते २६०० रुपयांनी विक्री होत आहे. किरकाेळ बाजारात ३० रुपये किलाे दरानेविक्री हाेत आहे. दिवाळीपासून पुन्हा आवक वाढणार असल्याने दर घसरणीबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

लासलगाव, पिंपळगाव, सटाणा, कळवण, देवळा या प्रमुख बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक वाढली आहे. दिवाळीपासून वाढ होण्याची शक्यता आहे. उन्हाळ कांद्याचे किरकोळ बाजारातील दर हे ८० ते १०० रुपये प्रतिकिलो गेले होते. त्यामुळे केंद्राने निर्यातमूल्यात वाढ करून निर्यातबंदी केली होती. मात्र, लाल कांद्याची आवक वाढल्याने दरात घसरण होऊनही केंद्राने निर्यातमूल्य कायम ठेवल्याने उत्पादक आणि निर्यातदारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

उन्हाळ कांद्याची यावर्षी वेळेपूर्वीच आवक घटल्याने किरकोळ बाजारात दीर्घकाळ दरात वाढ होती. पर्यायाने ग्राहकांमध्ये शासनविरोधात नाराजी व्यक्त होऊ लागली. कांदा दरावर नियंत्रण येण्यासाठी केंद्राने कांदा आयात आणि निर्यातबंदीचे शस्त्र उपसले होते. सध्या बंगळुरू, पुणे, संगमनेर, नगर आणि नाशिकमध्ये लाल कांद्याची आवक वाढली आहे. राजस्थान, गुजरात आणि बिहारमधील कांदा विक्रीसाठी येऊ लागला आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक होत असल्याने दरात घसरण होत आहे. त्यामुळे उत्पादकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. परदेशी बाजारपेठेतील ग्राहकावर पाकिस्तान, अफगाण, चीनचे निर्यातदार वर्चस्व प्राप्त करीत आहे.

निर्यातमूल्य शून्य करा
केंद्र सरकारने केवळ ग्राहकांचीच बाजू घेतली आहे. जो उत्पादक आहे, त्याचा कधीही विचार केलेला नाही. आवक वाढली, तरी निर्यातमूल्य कायम आहे. उत्पादक रस्त्यावर उतरण्यापूर्वीच निर्यातमूल्य शून्यावर आणावे. निवृत्ती न्याहारकर, कांदा उत्पादक

शासनाने प्रयत्न करावे
उन्हाळ कांद्याचे दर वाढले तेव्हा केंद्राने निर्यातमूल्य वाढविले. मात्र, आता आवक वाढली आहे. निर्यात अभावी दरात घसरण होत आहे. शेतकरी हितासाठी शासनाने प्रयत्न करावे. नानासाहेब पाटील, सभापती, लासलगाव बाजार समिती

निर्यात वाढवा
यावर्षी नाशिक जिल्ह्यात झालेल्या कमी पावसामुळे अनेक तालुक्यांत खरीप पिकांवर त्याचे वाईट परिणाम झाले आहे. त्यामुळे लाल कांद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील. परंतु, केंद्राने निर्यातमूल्य घटवून कांदा निर्यात वाढविण्याची गरज आहे. भरोसा अहिरे, कांदा उत्पादक

निर्यातमूल्यात घट करा
लाल कांद्याची आवक वाढली असल्याने दरात घसरण होत आहे. किरकोळ बाजारातही दरात घसरण झाली. मात्र, केंद्राने निर्यातमूल्य कायम ठेवल्याने निर्यात होत नाही. निर्यातमूल्यात त्वरित घट करण्याची गरज आहे. विकास सिंग, निर्यातदार
बातम्या आणखी आहेत...