आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Chess League News In Marathi, Nashik, Sport, Divya Marathi

इंडियन चेस लीगमध्ये दिसू शकेल नाशिकचा संघ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गतवर्षी झालेल्या इंडियन चेस लीगला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता यंदा चेस लीगच्या पुरस्कार रकमेसह खेळाडूंच्या बोली रकमेतही वाढ करण्यात आली आहे. तसेच गतवर्षीच्या 6 संघांऐवजी यंदा 8 संघांचा चेस लीगमध्ये सहभाग राहणार असून, त्यातील एक संघ नाशिकचादेखील राहण्याची चिन्हे असल्याचे मत प्रख्यात ग्रॅण्डमास्टर आणि चेस लीगचे आयोजक अभिजित कुंटे यांनी व्यक्त केले.

मागील वर्षी झालेल्या चेस लीग स्पर्धेत आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर सूर्यशेखर गांगुलीला सर्वाधिक सव्वा लाख, तर नाशिकचा आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर विदित गुजराथीला 90 हजार रुपयांची दुसर्‍या क्रमांकाची बोली लागल्याने खेळाडूंमध्येदेखील यंदा अधिक उत्साह असल्याचे मत कुंटे यांनी व्यक्त केले. गतवर्षी खेळाडू खरेदीसाठी संघांच्या मालकांना तीन लाख रुपयांची घातलेली र्मयादा यंदा साडेतीन लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच, स्पर्धेतील विजेत्या संघाच्या बक्षीस रकमेत वाढ करून ती रक्कम सहा लाख रुपये करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. गतवर्षी एप्रिलमध्ये झालेली ही स्पर्धा यंदा 11 ते 15 जून या काळात होणार असून, त्यात खेळाडू म्हणून मीही सहभागी होणार असल्याचे कुंटे म्हणाले.

चेस इन स्कूलचा प्रसार वेगाने : चेस इन स्कूल ही योजना अधिकाधिक शाळांमध्ये पोहोचण्यासाठी आम्ही प्रसार करीत असल्याचे कुंटे यांनी नमूद केले. राज्यातील 20 जिल्ह्यातील 192 शाळांमध्ये ही योजना सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील 28 शाळांचा यात समावेश आहे. केवळ नाशिकचा विचार केला तरी दरवर्षी किमान 1200 ते 1500 विद्यार्थी बुद्धिबळ शिकत असून, खेळाच्या प्रसाराच्यादृष्टीने ही चांगली बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशिक्षकांसाठी स्वतंत्र प्रशिक्षणाची व्यवस्था
राष्ट्रीय, आशियाई व जागतिक स्पर्धेतील विजेत्या बुद्धिबळपटूंसाठी आम्ही लॅपटॉप देतो. त्यामुळे अशा खेळाडूंना कॉम्प्युटरवरही नवनवीन चाली शिकणे, सराव करणे शक्य होत असल्याचे कुंटे यांनी सांगितले. दरवर्षी प्रशिक्षकांसाठी स्वतंत्र प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या वेळी उपस्थित नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी नाशिकचा संघ स्पर्धेत उतरवता यावा, यासाठी प्रायोजकत्व मिळाल्यास यंदाच्या स्पर्धेत नक्कीच सहभागी होण्याचा विश्वास व्यक्त केला.