आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअवघ्या बारा हजारांत विना गिअरची टू स्ट्रोक दुचाकी पंचवटी येथील तीन महाविद्यालयीन तरुणांनी बनवली आहे. 80 सीसी इंजिन असलेली ही गाडी लिटरमागे 60 चे मायलेज देते.
इगतपुरी येथील काशीनाथ मेंगाळ पॉलिटेक्निक महाविद्यालयात टीवायएमई डिप्लोमाचे शिक्षण घेणारे अमित गामणे, सचिन बागुल, नीलेश जगताप या तरुणांनी अवघ्या बारा हजारांत दुचाकी बनवण्याची किमया साधली आहे. याकरिता सुमारे 30 वर्षांपूर्वीचे अवंती होंडा कंपनीच्या दुचाकीचे इंजिन बसविण्यात आले आहे. या अनोखी दुचाकी शहर आणि परिसरात कुतूहलाचा विषय ठरली आहे. बघण्यासाठी गर्दी होत आहे.
अशी घडवली दुचाकी
स्कूटीचे चाक, होंडा आवंतिका दुचाकीचे इंजिन, विना गिअर, किक स्टार्ट, सिंगल क्लच सिस्टिम, प्लास्टिक पेट्रोल टाकी असे विविध भाग त्यासाठी वापरण्यात आले. दुचाकीची चेसी पुण्यातील एका कंपनीत कामास असलेल्या मित्राने बनवून दिली. काही स्पेअरपार्ट भंगार बाजारातून विकत घेतल्याचे त्यांनी सांगितले.
एकासाठी किफायतशीर
एक व्यक्ती आरामात शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर ही गाडी चालवू शकतो. नाशिक शहरात प्रथमच इतकी छोटी दुचाकी बनवण्यात आली असून, दिल्ली येथील एका व्यावसायिकाने या दुचाकीची मागणी केली असल्याचे या तरुणांनी सांगितले.
भविष्यात अशा दुचाकींना असेल मोठी मागणी
शहरातील वाढते वाहनांचे प्रमाण तसेच वाहतुकीच्या समस्यांवर तोडगा निघणार नाही, या कारणांमुळे अशा प्रकारच्या दुचाकींना भविष्यात नक्कीच मागणी वाढणार असल्याचे या तरुणांनी सांगितले. आमचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अशा दुचाकी बनवण्याचा मानसदेखील या तरुणांनी बोलून दाखविला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.