आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदिरानगर बोगदा पुन्हा खुला होण्याचे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थ कुंभमेळ्यात बंद केलेला इंदिरानगर बोगदा वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्याकरिता आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी पोलिस आयुक्तांसमवेत चर्चा केली. येथील बोगदा एकेरी खुला करण्यासाठी पोलिस आयुक्तांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने तो लवकरच खुला होण्याचे संकेत मिळाले आहेत. हा बोगदा बंद केल्याने स्थानिक नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

कुंभमेळ्यात वाहतूक नियोजनासाठी हा बोगदा दोन्ही बाजूने होणाऱ्या रहदारीसाठी बंद केला गेला. या काळात स्थानिकांसह लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेत बोगदा खुला करण्यासाठी आंदोलन केले हाेते. मात्र, या आंदोलनांचा पोलिस प्रशासनावर फारसा परिणाम झाला नाही. परिसरातील नगरसेवकांसह आमदारांनाही नागरिकांच्या नाराजीला सामोरे जावे लागले. निवडणुकीत या प्रकरणाचे पडसाद उमटतील, असे थेट आव्हानही नागरिकांनी लोकप्रतिनिधींना दिले होते. बोगदा बंदचा सर्वाधिक त्रास इंदिरानगरवासीयांना होत असल्याने अधूनमधून परिसरातील नागरिक पोलिस आयुक्तांसह आमदारांसोबत पत्रव्यवहार करीत आहेत. नागरिकांच्या भावनांचा आदर करीत आमदार प्रा. फरांदे यांनी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांची भेट घेऊन इंदिरानगर बोगदा एकेरी खुला करण्यासाठी आग्रह धरला. त्याकरिता उड्डाणपुलावरील ‘डाऊन वे’ बंद करण्याचा पर्याय ठेवण्यात आला. बोगदा बंद असल्याने गोविंदनगरमार्गे एबीबी सर्कल हा मुख्य रस्ता वापराविना पडून राहत असल्याचेही पोलिस आयुक्तांना पटवून देण्यात आले. पुलावरून उतरणारी वाहतूक पुढे द्वारकाकडे उतरवण्यासाठी फेरनियोजन करण्याच्या सूचनाही आमदारांनी केल्या. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यात येऊन कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार प्रा. फरांदे यांनी सांगितले.

एकेरी मार्ग खुला होणार
इंदिरानगर बोगदा वाहतुकीसाठी पूर्ण नाही, तर एकेरी खुला करण्यासाठी पोलिस आयुक्तांना सूचित करण्यात आले आहे. पोलिस आयुक्तांनी त्यावर सकारात्मक विचार करून बोगदा खुला करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे अाश्वासन दिले. बोगदा खुला करण्यासाठी लवकरच रस्ते प्राधिकरण विभागाशी चर्चा करणार आहे. प्रा. देवयानी फरांदे, आमदार