आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कवितांनाही असते नशीब : इंद्रजित भालेराव

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - काही माणसे भाग्यवान आणि काही कमनशिबी असतात. कवितांचेही तसेच असते. माझी ‘बाप’ ही कविता नशीबवान, तर ‘गावाकडे चल माझ्या दोस्ता’ ही काहीशी कमनशिबी ठरली, असे प्रतिपादन प्रख्यात कवी इंद्रजित भालेराव यांनी केले.
वसंत व्याख्यानमालेत कै. अण्णासाहेब वैशंपायन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुष्प गुंफताना भालेराव म्हणाले की, बाप ही कविता पाठ्यपुस्तक मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष प्राचार्य राम शेवाळकर यांनी मागून घेऊन पाचवीच्या पुस्तकात समाविष्ट केली. त्यानंतर अन्य पाठ्यक्रम बदलूनही ती दोन वेळा पाचवीला कायम ठेवण्यात आल्याने एकदा शेवाळकर गमतीने मला म्हणाले, की तुझी कविता पाचवीला पुजलेली आहे. तब्बल एक तपाहून अधिक काळ ही कविता अभ्यासक्रमात असल्याने किमान सात कोटी मुलांपर्यंत ती पोहोचल्याचे भालेराव यांनी नमूद केले. भालेराव यांनी ‘शेतामध्ये माझी कोपं तिला बोराटीची झाप, तिथे राबतो माझा शेतकरी बाप’ ही कविता सादर करून सांगितले की, या कवितेच्या नेमकी उलट अर्थात काहीशी कमनशिबी ठरलेली माझी ‘काट्याकुट्याचा तुडवित रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता’ ही कविता दहावीच्या पुस्तकात टाकायचे ठरले.
अगदी पुस्तके छापलीदेखील गेली, मात्र त्यानंतर काही कारणास्तव ती पुस्तके विद्यार्थ्यांना दिली गेलीच नाहीत. त्यामुळे ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलीच नाहीत. मुंबईच्या एका इंग्रजी शाळेत ही कविता सादर करताना आलेला अनुभव त्यांनी सांगितला. ते म्हणाले, माती, ऊन, पाणी, वारा आणि पृथ्वीपासून माणूस दुरावला की तो गोरा होतो आणि या सगळ्याच्या सान्निध्यात गेला की तो काळा होतो. यातून तेथील विद्यार्थ्यांना शेतात राबणा-या शेतक-याच्या काळ्या रंगाचे महत्त्व विशद केल्याचे त्यांनी नमूद केले.
चौदा वर्षांपूर्वी देशात पहिली शेतक-याची आत्महत्या लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे झाल्यावर त्या कुटुंबाला भेटायला गेल्यानंतर तिथे आलेला अनुभव विशद करताना ते म्हणाले की, वडिलांनी जीवन संपविल्याने आता आलेल्या संकटातून तू कसा मार्ग काढणार? या प्रश्नावर त्या घरातील मुलाने जगणे अवघड झाले तर मीदेखील बापाप्रमाणे एन्डोसल्फानचे औषध घेऊन आत्महत्या करेन आणि त्यासाठी बापाप्रमाणे मला बाटलीभर नव्हे, बुचभर औषधही चालेल, असे त्याने सांगताच मला गलबलून आलं. त्यावेळी ‘शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक’ ही कविता स्फुरली आणि ती अल्पावधीत खेड्यापाड्यातील सर्वसामान्यांच्या घरात जाऊन पोहोचली.