आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Industrial News In Marathi, Half Industry Now Started Isn't Basic Information At Nashik

नाशिकममध्‍ये अर्धेअधिक उद्योग आवश्यक माहितीविना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सातपूर, अंबड आणि स्टाईस या औद्योगिक वसाहतींतील सुमारे 55 टक्के उद्योगांनी औद्योगिक आरोग्य आणि सुरक्षा विभागाला अद्याप विस्तृत माहिती देणे टाळले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत माहिती न देणार्‍या उद्योगांवर कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

या विभागाला दरवर्षी अर्ज क्रमांक 27 द्वारे ही माहिती देणे बंधनकारक असून, यासाठी विभागासह नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनने (निमा) उद्योजकांना आवाहन करूनही त्याला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. औद्योगिक आरोग्य आणि सुरक्षा संचालनालय दरवर्षी उद्योगांकडून वार्षिक विवरणपत्र मागवते. यात उद्योगात कार्यरत असलेल्या स्त्री-पुरुष कामगारांची संख्या, संख्येनुसार कायद्यात दिलेल्या सुविधा, कामाच्या पाळ्या, उद्योगाचा परवाना क्रमांक यासारख्या बाबींची माहिती द्यायची असते. सातपूर, अंबड, स्टाईस येथील 55 टक्के उद्योगांनी ही माहिती दिलेली नसल्याचे समोर आले आहे. याचा परिणाम उद्योगांसाठी येणार्‍या केंद्र शासनाच्या विविध योजनांवर होणार असून, त्यामुळे उद्योगांनाही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

जाहीर खंत व्यक्त : औद्योगिक आरोग्य-सुरक्षा विभागाचे उपसंचालक अशोक डोंगरे यांनी याबाबत जाहीर खंत व्यक्त करीत, ‘या प्रक्रियेतून जमा होणारी माहिती संकलित करून ती केंद्र शासनाकडे पाठवली जाते व त्याच्या आधारावर उद्योगांसाठीच्या योजना ठरतात’, याकडे लक्ष वेधले. उद्योगांनी त्वरित ही माहिती भरून देण्याचे आवाहनही केले आहे.

आरोग्य आणि सुरक्षा विभागाने यासंदर्भात जनजागृती करायला हवी होती. मात्र, तसे न झाल्यानेच आवाहनाला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. आम्ही या विभागाच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबवू आणि प्रत्येक उद्योजकापर्यंत ही माहिती पोहोचवू. - सुरेश माळी, अध्यक्ष, ‘आयमा’

मोहीम राबवूनही अपयश
‘निमा’ने यासाठी जनजागृती कार्यशाळा घेतल्या आहेत. विभागाकडूनही वारंवार आवाहन केले गेले असले, तरी उद्योगांनी माहिती देण्यास विलंब केला आहे. ज्यांनी माहिती दिली नसेल, त्यांनी ती तत्काळ द्यावी. - मनीष कोठारी, अध्यक्ष, ‘निमा’