नाशिक- महिलांना व्यवसाय प्रशिक्षण देऊन सक्षम करणे आवश्यक असून, नाशिक शहरात प्रभागनिहाय महिलांना व्यवसाय प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबविण्याची गरज माजी खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी भवन येथे आयोजित ‘घे भरारी’ महिला प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
सदरच्या प्रशिक्षण शिबिरात ‘उद्योग का करावा? यासह जिल्हा खादी ग्रामोद्योग केंद्र, महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र बॅँक अर्थसाहाय्य, जिल्हा उद्योग केंद्र या विविध विषयांवर महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. महिला आर्थिक विकास मंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी जीवन गवळे यांनी मंडळाच्या विविध योजनांची माहिती या वेळी दिली. त्याचबरोबर महिलांना बचतगटाच्या माध्यमातून विविध
उद्योग स्थापन करून सक्षम व्हावे
यासाठी आर्थिक विकास महामंडळाकडून योग्य ती मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील यांनी महिलांना शासकीय योजनांची माहिती देऊन आपल्या कौशल्याचा व्यवसायात उपयोग करावा असे त्यांनी सांगितले.
महिलांनी संघटित होऊन काम केले तर उद्योग यशस्वी होऊ शकतील व त्यातून दर्जेदार वस्तू निर्माण करता येऊ शकतील. तसेच उद्योग यशस्वी होण्यासाठी प्रारंभी प्रशिक्षण घ्यावे, असेही ते म्हणाले. शिबिराचे आयोजक अर्जुन टिळे यांनी महिलांना फक्त प्रशिक्षण देऊन चालणार नाही तर त्याचा पाठपुरावा पदाधिका-यांनी करून त्यांना येणा-या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले. तसेच शहरात लवकरच विविध प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. या शिबिरात महिलांनी विचारलेल्या विविध प्रश्नांनाही मान्यवरांनी समर्पक उत्तरे दिली.
शिबिरास आमदार जयंत जाधव, सुनील बागुल, नाना महाले, दिलीप खैरे, प्रकाश नन्नावरे, अॅड. रवींद्र पगार, अर्जुन टिळे, शोभा मगर, कविता कर्डक, सचिन पिंगळे, अनिता भामरे, वंदना चाळीसगावकर, सीमा कदम, अंजुम खान, छबू नागरे, दीपक वाघ आदी उपस्थित होते.