आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसर्गजन्य आजाराने सिव्हिलमध्ये गर्दी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गेल्या आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे वातावरणात बदल होऊन हवेत विषाणूंचे प्रमाण वाढल्याने सर्दी, ताप, डोकेदुखीच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे जिल्हा रुग्णालयात लहान मुलांसह गरोदर महिलांची उपचारासाठी गर्दी होत असून, दररोज तपासणीसाठी येणार्‍या जवळपास 800 रुग्णांपैकी किमान 600हून अधिक रुग्ण विषाणूसंसर्गाचे आढळून येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

शहरातील खासगी बालरुग्णालयांसह जनरल फिजिशियनकडेही रुग्णांची गर्दी वाढत असतानाच जिल्हा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण कक्ष आणि उपचारासाठी दाखल होणार्‍या रुग्णांच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे. सिडकोतील त्रिमूर्ती चौक, पवननगर, उत्तमनगर, शिवाजीचौक, लेखानगर, इंदिरानगर, पंचवटी, गंगापूररोड भागातील बालरुग्णालयांमध्येदेखील गर्दी होत आहे. जिल्हा रुग्णालयातील बाह्य उपचार विभागातील (ओपीडी) रुग्णांचा आढावा घेतला असता गत दहा ते बारा दिवसांपासून तपासणीसाठी येणार्‍या रुग्णसंख्येचा आकडा 600 पासून 1 हजारापर्यंत पोहचले आहे, तर दाखल होणार्‍या रुग्णांच्या संख्येतही दुप्पटीने वाढ झाली आहे. विशेष म्हणजे हवेतील विषाणू संसर्ग (व्हायरल फिवर)चे सर्वाधिक लहान मुले आणि गरोदर महिला संसर्गाच्या कक्षेत येतात. या वयोगटातील रुग्णांची प्रतिकारक्षमता कमी असल्याने त्यांना पटकन या आजाराची लागण होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बालकक्षात 45 रुग्ण दाखल
जिल्हा रुग्णालयात बालकांच्या संख्येत वाढ झाल्याने नियमित 15-20 रुग्ण दाखल असताना आठवडाभरापासून 40 ते 45 बालके दाखल होत आहेत. या रुग्णांमध्ये 4 ते 11 वर्षे वयोगटातील बालक आहेत.

पालकांनी दक्षता घ्यावी
संसर्गाचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांमध्ये आढळून येतो. त्यांची प्रतिकारक्षमता कमी असते. यासाठी पालकांनी मुलांना सर्दी, पडसे झाल्यास दोन दिवस घरीच थांबून घ्यावे. ते इतरांच्या संपर्कात आल्यास त्यांच्या शिंकण्याने दुसर्‍यांनाही लागण होऊ शकते. कोणी शिंकत असल्यास लागलीच तोंडाला रुमाल लावण्याची सूचना करावी. डॉ. राजेंद्र दुसाने, बालरोगतज्ज्ञ

संसर्गामुळे संख्येत वाढ
पाऊस थांबल्यानंतर पूर्णपणे ऊन पडत नसून नियमित सूर्यदर्शन घडत नाही. ढगाळ वातावरणामुळे हवेत विषाणूंचे प्रमाण वाढत असून, त्याची एखाद्याला बाधा झाली की त्याच्या संपर्कात येणार्‍या बालक असो की महिलांना त्याची लागलीच लागण होते. यात, सर्दी, पडसे, ताप, थंडी वाजून येण्यासारखे लक्षणे दिसतात. डॉ. भारत आहेर, जनरल फिजिशियन