आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात भरदिवसा गोळीबार; 15 हल्लेखाेरांनी धारदार शस्त्राने वार करत मुलाची केली हत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - जेलरोड येथे तीन दिवसांपूर्वी झालेल्या एका महिलेच्या हत्येचा तपास लागत नाही, तोच उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मंगलमूर्ती-नगरमध्ये गुरुवारी (दि. २५) वाहनातून अालेल्या १५-१६ हल्लेखाेरांनी गुरुवारी (दि. २५) भरदिवसा गोळीबार करून दहशत निर्माण करत तुषार भास्कर साबळे (वय १६) या किशाेरवयीन मुलाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. 
 
याबाबत पाेलिसांनी दिलेली माहिती अशी की, जेलरोड येथील मंगलमूर्तीनगर येथील भाऊसाहेब जाधव (रा. हर्ष अपार्टमेट) यांच्याकडे कसारा येथे राहणारा त्यांचा नातेवाइक तुषार भास्कर साबळे हा दोन दिवसांपूर्वी एका लग्नासाठी आला होता. रविवारी सिडको येथे दुसऱ्या एका नातलगाचे लग्न असल्याने तो जाधव यांच्याकडेच थांबला होता. गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास त्याच भागात राहणारी त्याची आत्या विमल गांगुर्डे यांच्याकडे बसला असताना तुषारचा आतेभाऊ अक्षय भाऊसाहेब जाधव हा दुचाकीवर तेथे आला तुषार दुचाकीवर बसवून मंगलमूर्तीनगर येथे आला. त्यानंतर दोघेही इमारतीतील काही मित्रासोबत तेथे थांबले असता त्याचवेळी त्यांच्या पाठीमागून ओम्नी व्हॅन आणि इंडिगो कारमधून ताेंडाला काळे फडके बांधलेले १५-१६ युवक आले. त्यांनी वाहनातून उतरताच गोळीबार केला. सुदैवाने यात कोणालाही गोळी लागली नाही. गाेळीबारामुळे तेथे पळापळ सुरू झाली. अक्षय इमारतीमध्ये गेला तर तुषार हा मारेकऱ्यांच्या हल्ल्यात सापडला. त्याच्यावर मारेकऱ्यांनी कोयता तलवारीने वार केले. त्यानंतर हल्लेखाेर वाहनातून कॅनाॅलरोडमार्गे पसार झाले. तुषारला खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्याला बिटको रुग्णालयात जाण्यास सांगितले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला हाेता. बिटको रुग्णालयात तुषारच्या नातलगांनी हंबरडा फोडला. तुषार हा घरात मोठा असून त्याचे वडील जीआरपी (जनरल रेल्वे पोलिस) मध्ये नोकरीला आहे. त्याला एक लहान भाऊ आहे. या घटनेची बातमी पसरताच नाशिकरोड जेलरोड परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी घटनास्थळी हल्लेखाेरांबाबत चाैकशी केली. हत्येचे स्पष्ट कारण समजत नसल्याने या प्रकरणाच्या तपासाचे पाेलिसांपुढे अाव्हान अाहे. मारेकरी हे कसारा येथील आहे की नाशिकमधील, तसेच मारेकऱ्यांचा निशाणा हा अक्षय होता की तुषार याचाही पाेलिस तपास करत आहेत. 

पोलिस उपायुक्त कृष्णकांत पाटील, सहायक आयुक्त मोहन ठाकूर, नाशिकरोड ठाण्याचे निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, उपनगर ठाण्याचे निरीक्षक बाजीराव महाजन यांनी तपास केला. घटनास्थळावरून पाेलिसांनी चपला, माती, रक्त ताब्यात घेतले. 

पोलिसांचा वचक नाही 
नाशिकरोड,उपनगर, देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांनी डाेके वर काढले असून पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाला आहे. सध्या हेल्मेट सक्ती वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यावर पाेलिसांनी अधिक लक्ष केंद्रित केले अाहे. मात्र रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे हाेणारे अपघात त्यातून हाेणारे वाद, चौकाचौकात बसणारे टपोरी यांच्याकडे पाेलिसांचे दुर्लक्ष होत आहे.
बातम्या आणखी आहेत...