आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Information Given Oral Administration Encroachment Holders

अतिक्रमणधारकांना नोटिसींऐवजी प्रशासनाने दिली तोंडी सूचना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक रोड-अतिक्रमणाच्या विळख्यातील सापडलेल्या नाशिकरोड विभागात बुधवारी महापौर अँड. यतिन वाघ यांनी संपूर्ण परिसराची पायी फिरून पाहणी केली. शहरातील अतिक्रमणधारकांना तोंडी सूचनेद्वारे दोन दिवसांची मुदत देऊन त्यानंतर अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून महापौरांच्या पाहणी दौर्‍यास सुरुवात झाली. देवी चौक, जवाहर मार्केट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मेनरोड, वास्को चौक, मशीदरोड, मुक्तिधाम चौक व परिसर, बिटको रुग्णालयासमोरील रस्त्यांची पाहणी केली. स्थायी समितीचे सभापती रमेश धोंगडे, गटनेते अशोक सातभाई, विभागीय अधिकारी मीना हांडोरे, तसेच अतिक्रमण निर्मूलन, नगररचना, बांधकाम विभागासह इतर अधिकारी पाहणी दौर्‍यात सहभागी झाले होते. पाहणीदरम्यान बिटको रुग्णालयासमोर महापौरांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयंत फुलकर यांना रुग्णालयासमोरील रस्त्यावरील भाजीविक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याने त्याबाबत सूचना केल्या. रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीलगतच्या टपर्‍या हटवण्याचे आदेश त्यांनी दिले.
शहरातील अवैध बांधकाम, अस्वच्छता व विकासकामांची संथ गती पाहता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापौरांना प्रशासनावर अंकुश ठेवून तातडीने अतिक्रमण मोहीम राबविण्याच्या सूचना देत कामात सुधारणा करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर महापौरांनी लागलीच मुंबई नाका, सारडा सर्कल व नाशिकरोड भागात पाहणी दौरा करीत तातडीने अतिक्रमणांवर हातोडाही फिरविला होता.
नगरसेवकांच्या चालढकलीबाबत आश्चर्य
आमदार वसंत गिते यांचे संपर्क कार्यालय तोडण्यात आल्याच्या कारवाईने सत्ताधार्‍यांनी शहरवासीयांना चांगला संदेश दिला. मात्र, सिडको-इंदिरानगर या ‘मनसे’च्या बालेकिल्ल्यात बहुतांश नगरसेवकांनीही संपर्क कार्यालयांच्या ठिकाणी शेड उभारून अतिक्रमण केल्याचे दिसून येते. मात्र, एकाही नगरसेवकाने पुढाकार घेतला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दोन दिवसांनंतर मोहीम
वाहतुकीस अडथळा ठरणारे टपर्‍या व छोट्या व्यावसायिकांचे अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनास दोन दिवसांची मुदत दिली असून, तिसर्‍या दिवशी अतिक्रमण निर्मूलन मोहिमेस सुरुवात होईल. रमेश धोंगडे, सभापती, स्थायी समिती
पक्षांची कार्यालये हटविणार
मुंबई नाक्यावरील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाप्रमाणेच शहरात ज्या-ज्या पक्षांनी अतिक्रमण केलेले असेल, तेथील अतिक्रमण दोन दिवसांच्या मुदतीनंतर हटविले जाईल. अशोक सातभाई, गटनेते, मनसे
जय मनसे!
महापौरांच्या पाहणीदरम्यान व्यावसायिकांना अतिक्रमण मोहीम सुरू झाली असे वाटल्याने एका व्यावसायिकाने धावपळ करीत दुकान हटविण्यास सुरुवात केली, तर दुसर्‍याने आपण ‘मनसे’चे कार्यकर्ते असल्याचे समजण्यासाठी महापौरांनाच झोकात ‘जय मनसे’ केले!