आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना फलकांचीच हरवली ‘दिशा’, लवकरच दुरुस्तीचे काम हाती घेेणार...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील मुख्य रस्त्यांवर, चौकाचौकांत तसेच काही महत्त्वाच्या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यांवर काेट्यवधी रुपये खर्च करून महापालिका प्रशासनाच्या वतीने फलक उभारण्यात अाले हाेते. वाहतूक शाखेच्या सूचनेनुसार शहरांतर्गत वाहनतळ, नो पार्किंग, नगरसेवक निवासस्थान, हाॅस्पिटल, सरकारी कार्यालये, शाळा, वळण घेणे, घेणे, एकेरी मार्ग याबाबतची माहिती देणाऱ्या तसेच दिशा दर्शवणाऱ्या फलकांची उभारणी माेठ्या संख्येने करण्यात अाली खरी. मात्र, अाजघडीला प्रशासनाच्याच उदासीनतेमुळे यापैकी अनेक फलकांची माेठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असल्याचे चित्र ‘डी. बी. स्टार’ने केलेल्या पाहणीत दिसून अाले आहे. अनेक ठिकाणी तर वाहनचालक, नागरिकांना दिशा दर्शवण्यासाठी उभारण्यात अालेले हे फलक दिशाभूलच अधिक करीत असल्याचे दिसून अाले. यामुळे प्रशासनाने वेळीच ही बाब गांभीर्याने घेऊन या फलकांच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी अनेक जागरूक नागरिकांकडून करण्यात येत अाहे.
याठिकाणी अाहे समस्या...
पोलिस आयुक्तालयाच्या आवारात तसेच समोरील भागात लावण्यात अालेल्या फलकांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. कॅनडा कॉर्नरवरून शरणपूर लिंकरोडमार्गे त्र्यंबकराेडला जोडणाऱ्या मार्गावर काही फलक माेडकळीस अाले अाहेत. या ठिकाणच्या एका चौकात दिशादर्शक फलकाने मान टाकली असून, ताे कुठल्याही क्षणी कोसळून अपघातास कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशीच काहीशी स्थिती मुंबई नाका, संदीप हॉटेलसमोरील कुटे मार्गाच्या फलकाची झाली आहे. पंचवटीतील गंगाघाट, मालेगाव स्टॅँड, मखमलाबाद नाका, द्वारका चौक, सिडकोत त्रिमूर्ती चौक, कामटवाडे गाव दाखवणाऱ्या फलकांचीदेखील अशीच दुरवस्था झाली आहे. बहुतांश फलकांवरील रंग उडून गेला असून, नुसत्या मोडकळीस आलेल्या पाट्या लटकलेल्या दिसत अाहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थी, वाहनधारक आणि पर्यटकांची दिशाभूल होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
महापालिकेच्या वतीने लाखाे रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले शेकडो दिशादर्शक फलक अाजघडीला महापालिकेच्याच गुदामात धूळखात पडून असल्याचे ‘डी.बी. स्टार’च्या पाहणीत दिसून अाले अाहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पडून असलेल्या या फलकांची तूटफूट झाली असून, काही फलक तर सडण्याच्या वाटेवर अाहेत. बरेचसे फलक चाेरीस गेल्याचेही दिसून येते. एकूणच पालिकेच्या दुर्लक्षामुळे फलकांची दुरवस्था हाेऊन पालिकेचेच आर्थिक नुकसान होत अाहे.

खर्चावर अंकुश असावा
^महापालिकेकडू निकत्येकबाबींवर अवाजवी खर्च केला जाताे. फलकांवरदेखील लाखाे रुपये खर्च करण्यात अाला अाहे. मात्र, त्याची विनाकारण तूटफूट हाेत असल्याने हा सर्व खर्च पाण्यात जात अाहे, असे म्हटल्यास चुकीचे नाही. अाता पुन्हा विनावापर या फलकांवर दुरुस्तीचा खर्च करावा लागणार अाहे. - अविनाश बच्छाव

नागरिकांची दिशाभूल..
^महापालिका प्रशासनाने सूचना फलक, दिशादर्शक फलक उभारले अाहेत. मात्र, त्यांच्याकडे नियमितपणे लक्षही द्यायला हवे. जेणेकरून त्यांची दुरवस्था हाेणार नाही अाणि पालिकेला अार्थिक झळही साेसावी लागणार नाही. नागरिकांची दिशाभूल करणारे फलक तातडीने बदलावेत. तसेच, दुरवस्था झालेल्या फलकांचीही दुरुस्ती व्हायला हवी. - रमेश काळाेशे, नागरिक

अनेक फलकांवर चुकीचा उल्लेख
महापालिकेच्या वतीने शहरात लावण्यात आलेल्या फलकांंमध्ये अनेक चुका आहेत. त्र्यंबक नाक्यावरील जिल्हा परिषदेजवळ लावण्यात आलेल्या दिशादर्शक कमानीवर शहीद अब्दुल हमीद चौकएेवजी ‘हमीद चौक’ असा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर, सातपूर रस्त्यावरील त्र्यंबककडे जाणाऱ्या रस्त्यावर महापालिकेने लावलेल्या कमानीवर आतील बाजूने म्हणजेच चुकीच्या दिशेने त्र्यंबक रस्ता दर्शवला आहे. अनेक महापुरुषांच्या नावातदेखील चुकीचा उल्लेख असल्याचे ‘डी.बी. स्टार’च्या पाहणीत दिसून अाले अाहे. काही ठिकाणी उल्लेख पुसला गेल्याचेही दिसून अाले.

अनेक ठिकाणी फलकांअभावी गैरसाेय
गुजरातच्या हद्दीतून बलसाड सापुतारामार्गे नाशिक शहरात येणाऱ्या अवजड वाहनांची योग्य ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने गैरसाेय हाेते. अनेकदा अपघातही हाेतात. शहरात ठरावीक कालावधीतच मोठ्या वाहनांना प्रवेश आहे. या भागातून येणाऱ्या वाहनांसाठी मखमलाबाद नाका, आर.टी. ओ. कार्यालय, आर.टी.अो. कॉर्नर, नवीन बाजार समिती, तारवालानगर या ठिकाणी योग्य दिशादर्शक फलक नसल्याने अनेकांचा गोंधळ उडतो. त्यामुळे अनेक वाहनचालकांची दिशाभूलही हाेते. अशा प्रत्यक्षात गरज असलेल्या ठिकाणी फलक लावण्याची तत्परता पालिकेकडून दाखवली जात नसून, गुदामात शेकडो फलक भंगारात टाकले गेले अाहेत, हे विशेषच.

माजी नगरसेवकांवर अधिकारी मेहेरबान...
महापालिकेत आजतागायत शेकडो नगरसेवक होऊन गेले. प्रभागातील नगरसेवकांचे निवासस्थान संपर्क कार्यालयाची माहिती नागरिकांना मिळावी, म्हणून विद्यमान नगरसेवकांच्या घराबाहेर कार्यालयाबाहेर महापालिकेच्या वतीने सूचनाफलक लावले जातात. मात्र, शहरात आजी नगरसेवकांबराेबरच माजी नगरसेवक, माजी आमदार, माजी खासदार असे अनेकांचे फलक दिमाखात लावण्यात आलेले आहेत. तर, अनेक माजी नगरसेवकांच्या घराबाहेर प्रसिद्धीपाेटी नगरसेवक उल्लेखाचा फलक आजही तसाच आहे. यामुळे नागरिकांचा अनेकदा संभ्रम हाेत असल्याचे दिसून येते.

लाेकप्रतिनिधी, पालिका अधिकाऱ्यांचेही दुर्लक्षच
फलकांची दुरवस्था झालेल्या मार्गांवरून महापालिकेचे कर्मचारी, नगरसेवक आणि आयुक्त, उपआयुक्त यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही वावर असताे. ते या फलकांकडे डोळेझाक करीत असल्याने सर्वसामान्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, या फलकांवरील खर्चाचा हिशेब उपस्थित होऊन त्यातील काही गैरव्यवहार उघडकीस येऊ नये, म्हणूनच की काय या फलकांच्या दुरुस्तीकडे हेतुत: दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही काही नागरिकांकडून केला जात आहे.

दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कुणाची..?
सार्वजनिक मालमत्तेचा प्रश्न असला तरीही त्याच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यायला महापालिका प्रशासन तयार नसल्याचे दिसून येते. संरक्षक जाळ्या अथवा इतर कुठले साहित्य चोरीला गेले की, सोपस्कार केल्यासारखे त्याची तक्रार करण्यापलीकडे महापालिकेकडून काही पावले उचलली गेल्याचे दिसून येत नाही. यामुळे अनेक साधनांची दुरवस्था झाली अाहे. विनाकारण खर्चाचा घाट ठरणाऱ्या या उदासीन धाेरणाबाबत महापालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता, प्रशासन हात झटकून माेकळे झाले. केवळ खरेदीचाच अट्टहास करणाऱ्या प्रशासनाच्या या वृत्तीमुळे पालिका तिजाेरीत अधिक खडखडाट हाेत अाहे.
थेट प्रश्न
प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अनेक दिशादर्शक, सूचना फलकांची तूटफूट; काही फलकांना चाेरट्यांनी केले लक्ष्य
शहरात अनेक ठिकाणी गरज असताना महापालिकेने तयार केलेले दिशादर्शक फलक गुदामातच गंजण्याच्या वाटेवर; लाखाे रुपयांचा खर्च पाण्यात, एेन पावसाळ्यातही फलकांच्या सुरक्षेचा प्रश्न कायम शहरातील मुख्य रस्त्यांवर, चौकाचौकांत तसेच पर्यटनस्थळी जाणाऱ्या मार्गांवर, वाहनतळ, नो पार्किंग, नगरसेवक निवासस्थान, शाळा, हाॅस्पिटल, वळण घेणे, घेणे अादी ठिकाणी माहिती देणारे दिशा दर्शवणारे फलक वाहतूक शाखेच्या सूचनेनुसार महापालिकेने उभारले खरे. मात्र, लाखो रुपये खर्चून उभारलेल्या यातील बहुसंख्य फलकांची अाजघडीला दुरवस्था झाल्याचे दिसून येत अाहे. काही फलकांवरील उल्लेख पुसला गेला अाहे, तर काही फलक माेडकळीस अाले अाहेत. अनेक फलक तर अक्षरश: पालिकेच्याच गुदामात गंजण्याच्या वाटेवर असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत दिसून अाले अाहे. बाहेरगावहून येणाऱ्या नागरिकांसह नाशिककरांचीही फलकांअभावी दिशाभूल हाेऊ नये, यासाठी दुरुस्ती हाेणे अावश्यक अाहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हे फलक गंजू नयेत, यासाठी प्रयत्न हाेणे गरजेचे असताना प्रत्यक्षात मात्र तसे हाेताना दिसून येत नाही. दिशादर्शक फलकांच्या दुरवस्थेवर ‘डी. बी. स्टार’चा हा प्रकाशझोत...
पी. एम. गायकवाड, कार्यकारीअभियंता, मनपा बांधकाम विभाग
{शहरात अनेक ठिकाणी लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकांची तूटफूट झाली आहे, त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करणार का?
-शहरातील दिशादर्शक फलकांची किरकोळ अपघातामुळे तूटफूट झालेली आहे. त्याच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
{महापालिकाप्रशासनाकडून लाखो रुपये खर्च करून खरेदी केलेली शेकडो दिशादर्शक फलक काही वर्षांपासून धूळखात पडून आहेत, त्याचे काय?
-पंचवटीतील गुदामात पडलेल्या दिशादर्शक फलकांना कुठे आणि कसे वापरावयाचे, याचे नियोजन सुरू असून, त्या फलकांना लवकरच वापरात अाणले जाणार आहे.
{शहरातअनेक ठिकाणी माजी लोकप्रतिनिधींचे फलक उभे आहेत, काही फलकांवरील उल्लेख चुकीचा अाहे, त्याचे काय?
-माजी लोकप्रतिनिधींच्या नावाचा उल्लेख असलेल्या फलकांचे सर्वेक्षण सुरू असून, तेही लवकरच काढण्यात येतील. चुकीचा उल्लेख असलेल्या फलकांची लवकरच दुरुस्ती केली जाणार अाहे.
मा. महापाैर
बातम्या आणखी आहेत...