आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजावला माहितीचा अधिकार अन् एसटीचा भोंपू हद्दपार..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- माहितीच्या अधिकाराचा वापर करून शासकीय योजनांमधील अनेक मोठे घोटाळे उघडकीस झाले. याच अधिकाराचा वापर करून इंधन बचतीबरोबरच वायू व ध्वनिप्रदूषण रोखत पर्यावरण रक्षणाचे कार्य एका कार्यकर्त्याने साधले आहे. राज्य परिवहन महामंडळाकडे (एस.टी.) तब्बल पाच वर्षे पाठपुराव्यानंतर नाशिक विभागातील तब्बल 971 बसेसला इलेक्ट्रिक हॉर्न बसविण्याची करामत या माहिती अधिकाराने घडवली आहे.

मोटार वाहन कायद्यानुसार, प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांना इलेक्ट्रिक हॉर्न बसविणे अनिवार्य आहे. गर्दीतून वाहने हाकताना बसचालकांकडून हॉर्नऐवजी अँक्सलेटरचा आवाज करत इतर वाहनांना बाजूला करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण वाढते. मोठय़ा प्रमाणात इंधन जळते, असे निदर्शनास आले होते. माहिती अधिकार कायद्याद्वारे बाळासाहेब कुरूप यांनी या प्रकरणी महामंडळाला टाळ्यावर आणले. कुरूप यांनी सन 2007 मध्ये एस. टी. च्या विभागीय नियंत्रक, यंत्र अभियंता (चालन), उपयंत्र अभियंता आणि जिल्ह्यातील 13 आगार व्यवस्थापकांना माहिती अधिकारामार्फत आपल्या आगारातील किती बसेसला इलेक्ट्रिक हॉर्न बसविले असा प्रश्न विचारून माहिती मागविली. प्राप्त माहितीत केवळ 10 ते 15 टक्के बसेसला हॉर्न बसविल्याचे स्पष्ट झाले. कुरूप यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांशी वारंवार पत्रव्यवहार करून हॉर्नची आवश्यकता पटवून दिली व याबाबतच्या कायद्याचे कसे उल्लंघन होते याची महामंडळाला जाणीव करून दिली. यानंतर विभागीय नियंत्रक जागे झाले. त्यांनी टप्प्याटप्प्याने शहर आणि ग्रामीण भागातील बसेसला इलेक्ट्रिक हॉर्न बसविण्याची मोहीम हाती घेतली. महिनाअखेरीस एकूण 971 बसेसला हॉर्न बसविल्याचे महामंडळाने पत्राद्वारे कुरूप यांना कळवत त्यांच्या लढय़ाचे कौतुक केले.

राज्यात नाशिक ठरणार नंबर वन
राज्य परिवहन महामंडळाच्या तीसहून अधिक विभागीय कार्यालयांमध्ये सर्वांधिक बसेसची संख्या नाशिक विभागात असून, या सर्व बसेसला इलेक्ट्रिक हॉर्न बसविण्यात आल्याने नाशिक क्रमांक एकचे कार्यालय ठरले असल्याचा दावा महामंडळाकडून करण्यात आला आहे.

इंधन बचतीस मदत
शहर बसेसच्या 178 आणि ग्रामीणच्या 13 आगाराच्या 793 अशा एकूण 971 बसेसला इलेक्ट्रिक हॉर्न बसविण्यात आले.यामुळे डिझेलचा अपव्यय होऊन प्रदूषणात भर पडत असे; मात्र हॉर्नमुळे इंधन बचत होणार आहे.
-कैलास देशमुख, विभागीय नियंत्रक, एस.टी.

यंत्रणेच्या उदासीनतेचे दर्शन
एसटीकडे सततच्या पाठपुराव्यानंतर इलेक्ट्रिक हॉर्न बसेसला बसविण्यात आले. या पाच वर्षांच्या काळात प्रचंड मानसिक त्रास झाला. वरिष्ठ अधिकार्‍यांपासून कर्मचार्‍यांमध्ये मोठय़ा प्रमाणात उदासीनता दिसून आली.
-बाळासाहेब कुरूप, माहिती अधिकार कार्यकर्ता