आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Information Technology,Latest News In Divya Marathi

भविष्यातील तंत्रज्ञान कल्पनेपलीकडचेच- अच्युत गोडबोले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- इ-लर्निंग, अफाट माहिती साठविणार्‍या मायक्रोचिप्स यांसह काही वर्षांपूर्वी अशक्यप्राय किंवा स्वप्नवत वाटणार्‍या गोष्टी आज प्रत्यक्षात आल्या आहेत. आपले भविष्य याहूनही अधिक आधुनिक आणि कल्पनेच्या पलीकडचे असेल यात शंका नाही, असे प्रतिपादन माहिती तंत्रज्ञानतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी केले.
महाकवी कालिदास कलामंदिर येथे मातोर्शी शिक्षण संस्थेचे मातोर्शी अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्र यांच्यातर्फे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ‘माहिती तंत्रज्ञान : काल-आज आणि उद्या’ या विषयावर गोडबोले बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र दराडे, माजी प्राचार्य वसंत बर्वे, प्राचार्य डॉ. गजानन खराटे उपस्थित होते. उपप्राचार्य डॉ. वर्षा पाटील यांनी प्रास्ताविक केले. गोडबोले पुढे म्हणाले, भविष्यात आयटी हे सर्वात अग्रेसर क्षेत्र राहील. जागतिक मंदीमुळे आयटी उद्योगावर कोणताही फरक पडणार नाही. आजही देशाच्या ‘जीडीपी’मधील सर्वात जास्त हिस्सा आयटी उद्योगांचा आहे. नोकर्‍या देणार्‍या कंपन्यांतही आयटी उद्योगांचा समावेश अधिक आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने संगणक साक्षर होण्याची गरज आहे. सर्वांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करणे अत्यावश्यक आहे. संगणकाच्या जन्मानंतर जग वेगाने बदलले. खुद्द संगणकातही अनेक बदल झाले. भविष्यात बदलाचा हा वेग अधिक प्रचंड असेल. भविष्यात ऑफिसेस, शाळा, कॉलेजेस यांच्या भव्य इमारतींची गरज भासणार नाही. अनेक कामे घरी बसूनच तंत्रज्ञानाच्या मदतीने करता येतील. उडत्या मोटारींची कल्पना आता स्वप्न राहिलेली नाही, तर परदेशी बाजारपेठांत त्या सहज उपलब्धही होऊ लागल्या आहेत.
संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी संस्थेविषयी माहिती दिली. यानंतर उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. प्रा. उदय नाईक यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. वर्षा पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध महाविद्यालयांतील संगणक शाखेचे विद्यार्थी, शिक्षक, पालक व नाशिककर र्शोते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
बदलते तंत्रज्ञान स्वीकारा
सर्वच क्षेत्रात माहितीचा मोठय़ा प्रमाणावर वापर होतो. ही अत्यंत महत्त्वाची असणारी माहिती संग्रही ठेवताना अनेकदा अडचणीही येतात. कधीकधी माहिती पूर्णपणे नष्टही होण्याची भीतीही असते. त्यामुळे प्रत्येकाने माहिती तंत्रज्ञानाचा योग्य आणि काळजीपूर्वक वापर करणे अधिक गरजेचे आहे. तंत्रज्ञानाच्या योग्य वापराबरोबरच त्याच्या प्रत्येक बदलांचा स्वीकार करणेदेखील तितकेच गरजेचे आहे. कारण बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार ही काळाची गरज बनली असल्याचेही गोडबोले यांनी या वेळी मार्गदर्शन करताना सांगितले.